Pune : नानगावमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ | पुढारी

Pune : नानगावमध्ये दिवसाढवळ्या चोरट्यांचा धुमाकूळ

नानगाव : पुढारी वृत्तसेवा :  नानगाव (ता. दौंड) येथील गायकवाड वस्तीवरील संदीप गायकवाड यांच्या घरी बुधवारी (दि. 29) दिवसाढवळ्या साडेबाराच्या सुमारास चोरट्यांनी चोरीचा प्रयत्न केला. मात्र ,चोरट्यांना घरात काही मिळाले नसून तेथून पळ काढला. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. गायकवाड वस्ती ही गणेशरोड परिसरात एका बाजूला आहे. सगळ्या बाजूला उसाची शेती असून शेजारी काही घरे आहेत. बुधवारी सकाळी संदीप गायकवाड यांच्या घरातील मंडळी शेतीच्या कामासाठी घराबाहेर पडले होते.

संबंधित बातम्या :

मुलगा रोहन गायकवाड हा एकटाच घरात होता. दुपारी साडेबाराच्या सुमारास तीन चोरटे दारातून घरात शिरले त्यांच्या अंगावर काळा शर्ट, काळी पॅन्ट व काळा मास्क घातला होता. चोरट्यांनी कपाट, लाकडी सोफा उघडून साहित्य अस्ताव्यस्त फेकले. मात्र, त्यांना यामध्ये काही सापडले नाही. घरात काही सापडत नाही असा अंदाज आल्यावर चोरट्यांनी तेथून पळ काढला. झालेली घटना रोहनने पाहिली व त्याने वडील संदीप गायकवाड यांना फोन करून सांगितले. या वेळी शेतात काम करणारे संदीप गायकवाड व सगळ्या मंडळींनी घराकडे धाव घेतली. घरातील कपाट व सोफ्यातील साहित्य अस्ताव्यस्त पडलेले पाहिले. त्यांनी घडलेली घटना माजी उपसरपंच संदीप खळदकर यांना सांगितली. त्यानंतर खळदकर यांनी केडगाव पोलिसांना यासंदर्भात माहिती दिली. माहिती मिळताच केडगाव पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक संदेश बावकर व त्यांच्या सहकार्‍यांनी घटनास्थळी दाखल होत पाहणी केली.

 

चोरट्यांकडून बंद घरामध्ये चोरी करण्याचे प्रयत्न होत आहेत. गावागावांत ग्रामपंचायत प्रशासनाकडून सीसीटीव्ही कॅमेरे बसविणे गरजेचे आहे. तसेच वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी घरात अतिरिक्त सोने व रोख रक्कम ठेवू नये. गावात ग्रामसुरक्षा दल कार्यरत करण्यासाठी पोलिस सहकार्य करतील.

                                                   – हेमंत शेडगे, पोलिस निरीक्षक, यवत.

 

Back to top button