पिंपरखेड : पुढारी वृत्तसेवा : अवकाळी पाऊस, धुके, ढगाळ वातावरणामुळे रब्बी हंगामातील कांदा पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे. त्यामुळे शिरूर तालुक्याच्या बेट भागातील कांदा उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. शिरूर तालुक्यातील पिंपरखेड, काठापूर, जांबूत, फाकटे, चांडोह, टाकळी हाजी परिसरात व वडनेर परिसरात मोठ्या प्रमाणात रब्बी हंगामातील कांदा पिकाचे उत्पादन घेण्यात आले आहे. सध्या काही कांद्याचे पीक एक महिन्याचे होऊन गेले आहे. तसेच नवीन लागवडी सुरू आहेत. मात्र, कांदा पिकासाठी पोषक थंडीचे वातावरण गायब होऊन अवकाळी पावसाने कांदा पिकाला चांगलेच झोडपून काढले.
पावसाच्या उघडीपीनंतर ढगाळ वातावरण व सकाळच्या धुक्याचा कांदा पिकावर विपरीत परिणाम झाल्याचे पाहायला मिळत आहे.
पिकावर मावा, तुडतुडे, फुलकिडे यांचा प्रादुर्भाव होऊन पात वाकडी झाली आहे. करपा रोगाचाही प्रादुर्भाव झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे पिकाचे संरक्षण करण्यासाठी शेतकर्यांना महागडी औषधी फवारणी करावी लागत आहे. परिणामी, कांद्याच्या उत्पादन खर्चात भर पडणार असल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत.
हेही वाचा :