Accident News : एकलहरेजवळ झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार | पुढारी

Accident News : एकलहरेजवळ झालेल्या अपघातात तिघे जागीच ठार

मंचर : पुढारी वृत्तसेवा : पुणे-नाशिक महामार्गावर आंबेगाव तालुक्यातील एकलहरे मंचर येथे क्रुझर जीप गाडी आणि मालवाहतूक टेम्पो यांचा अपघात झाला. यामध्ये क्रुझर जीप गाडीमधील तीन जण ठार तर पाच जण जखमी झाले. ही घटना शुक्रवारी (दि. १) पहाटे घडली. अपघातात ठार झालेले आणि जखमी झालेले सर्वजण जायखेडा (ता. सटाणा, जि. नाशिक) येथील असून जखमींवर मंचर उपजिल्हा रुग्णालयात उपचार चालू आहे. अपघाताचे कारण पहाटेच्या वेळी पडलेले धुके असल्याचे सांगण्यात आले.

मंचर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जायखेडा तालुका सटाणा येथून भोसरी येथे कार्यक्रमासाठी क्रुझर जीप गाडी (नंबर एमएच १९ वाय ६३०१) कळंब येथून एकलहरे मंचरच्या दिशेने जात होती. त्याच क्रूजर जीप गाडीसमोर मालवाहतूक टेम्पो (एमएच २८ ए बी ७५६४) हा चांलला असताना अचानकपणे टेम्पो वा त्याच्यापुढे काहीतरी असल्यामुळे ब्रेक दाबला. पहाटे दाट धुके असल्यामुळे मालवाहू वाहतूक टेम्पोच्या पाठीमागे असलेल्या क्रुझर जीप चालकाने समोर चाललेल्या टेम्पोला मागून जाऊन धडक दिली. या अपघातात क्रुझर टेम्पोमध्ये शांताराम संभाजी अहिरे (वय ५१), मधुकर तुकाराम अहिरे (वय ५५) आणि क्रुझर चालक पंकज खंडू जगताप (वय ३५) हे जागीच ठार झाले तर सुभाष तुकाराम अहिरे (वय ६५), सुशिला सुभाष अहिरे (वय ६०), कमलाकर सुभाष अहिरे (वय ४५), मनोहर अशोक अहिरे (वय ३८, सर्व रा. जायखेडा, ता. सटाणा, जि. नाशिक) आणि जिभाऊ रामभाऊ शेवाळे (वय ५८, रा. लोणेर, ता. देवळा, जि. नाशिक) हे जखमी झाले.

मंचर उपजिल्हा रुग्णालयात जखमी आणि मृतांना नेण्यासाठी रुग्णवाहिका चालक स्वप्निल लोखंडे, अमित काटे, गणेश शिंदे, गौरव बारणे तसेच पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी, स्थानिक ग्रामस्थांनी मदत केली. पहाटेच्या वेळी धुके असल्याने दोन्ही वाहन चालकांना अंदाज न आल्यामुळे अपघात झाल्याचे सांगण्यात आले. या घटनेच्या अपघाताचा तपास मंचर पोलीस करत आहेत.

हेही वाचा :

Back to top button