Pune : धनगर समाजाचे 7 डिसेंबरपासून दिल्लीत आंदोलन : वाघमोडे | पुढारी

Pune : धनगर समाजाचे 7 डिसेंबरपासून दिल्लीत आंदोलन : वाघमोडे

बारामती : पुढारी वृत्तसेवा : धनगर समाजाला एसटी प्रवर्गाचे आरक्षण लागू करावे, या मागणीने राज्यात जोर धरला आहे. त्यासाठी आंदोलने, उपोषणे केली जात आहेत. आता अहिल्यादेवी क्रांतीशौर्य संघटनेकडून या प्रश्नी 7 डिसेंबरपासून दिल्लीत जंतरमंतरवर धरणे आंदोलन केले जाणार आहे. संघटनेच्या संस्थापक अध्यक्षा कल्याणी वाघमोडे यांनी ही माहिती दिली. धनगर समाजाला आरक्षण न दिल्यास सरकारला झोपवू, असा इशारा वाघमोडे यांनी दिला. येत्या हिवाळी अधिवेशनात राज्य व केंद्र सरकारने हा प्रश्न मार्गी लावावा, अशी मागणी त्यांनी केली.

सन 2014 ते 2019 केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार होते. त्यामुळे धनगर समाजाला आरक्षण अंमलबजावणी होईल अशी अपेक्षा होती. परंतु, सरकार आल्यावर पहिल्या कॅबिनेटमध्ये आरक्षण देऊ, असे आश्वासन देणार्‍या देवेंद्र फडणवीस यांनी या प्रश्नी वेळकाढूपणा केला. शासनाने धनगर आरक्षणासाठी अभ्यास समिती गठित केली आहे. परंतु, ही फसवणूक आहे. धनगर समाज नव्याने आरक्षण मागत नाही. घटनेत असलेल्या आरक्षणाची अंमलबजावणी करावी एवढीच आमची मागणी असल्याचे वाघमोडे यांनी सांगितले. दिल्लीतील आंदोलनात एसटीचे आरक्षण मिळावे, ओबीसींची जातनिहाय जणगणना करावी, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंतीनिमित्त शासकीय सुटी जाहीर करावी, मेंढपाळांसाठी संरक्षण व मेंढ्यांसाठी राखीव चराई क्षेत्र उपलब्ध करावे, मेंढपाळांचा विमा काढावा आदी मागण्या केल्या जाणार आहेत.

हेही वाचा :

Back to top button