Pune News : तमाशा कलावंतांना लोकाश्रय मिळावा : खा. श्रीनिवास पाटील | पुढारी

Pune News : तमाशा कलावंतांना लोकाश्रय मिळावा : खा. श्रीनिवास पाटील

पुणे : पुढारी वृत्तसेवा : तमाशा हा आपला सांस्कृतिक वारसा आहे. पण, आज तमाशाला दाद देणारे रसिक कमी झाले आहेत. ही कला जपण्याची गरज आहे. रसिकांनी कलावंतांना भरभरून दाद द्यावी. कलावंतांना आधार देण्याचे काम रसिकांनी करावे. आपण कलावंतांचे आश्रयदाते व्हायला हवे. आज कलावंतांच्या अनेक समस्या आहेत. तमाशा कलावंतांच्या मुलांना मोफत शिक्षण, आरक्षण आणि नोकरी मिळावी यासाठी सरकार दरबारी प्रयत्न करणार आहे, असे खासदार श्रीनिवास पाटील यांनी गुरुवारी सांगितले.

कै. पठ्ठे बापूराव प्रतिष्ठान आणि सांस्कृतिक कला मंडळाच्या वतीने आयोजित लावणी महोत्सवात श्रीनिवास पाटील व आमदार रवींद्र धंगेकर यांच्या हस्ते ’शाहीर पठ्ठे बापूराव पुरस्कार’ ज्येष्ठ लोकनाट्य कलावंत मालती इनामदार यांना प्रदान करण्यात आला. त्या वेळी पाटील बोलत होते. लोकसाहित्यिक शाहीर डॉ. भास्करराव खांडगे पुरस्कार लावणी गायिका व नृत्य कलाकार शोभा इस्लामपूरकर यांना, पवळा पुरस्कार लावणी नृत्य कलाकार वैशाली वाफळेकर यांना व ’शाहीर बापुसाहेब जिंतीकर पुरस्कार’ ढोलकी वादक कृष्णा मुसळे यांना प्रदान करण्यात आला. तर लोककलावंतांना सहकार्य करणारे शिवदास शेटे यांचा विशेष सन्मान या वेळी करण्यात आला.

ज्येष्ठ अभिनेत्री लीला गांधी, प्रशांत जगताप, प्रतिष्ठानचे अध्यक्ष जयप्रकाश वाघमारे, सत्यजित खांडगे आदी उपस्थित होते.
पाटील म्हणाले, आज तमाशाचा ऑर्केस्ट्रा झाला आहे. ते बंद करायले हवे. जुन्या लावण्या एकापेक्षा एक होत्या. त्या नव्या रूपात आणायला हव्यात. कलावंतांनी मांडलेले त्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करेन. वाफळेकर म्हणाल्या, मला पुरस्कार मिळाला त्याचा आनंद आहे. परिस्थितीमुळे मला शिकता आले नाही म्हणून मी कलेच्या क्षेत्रात आले. आम्हा कलावंतांच्या मुलांचे शिक्षणाचे प्रश्न सरकारने सोडवायला हवेत. धंगेकर यांनी मनोगत व्यक्त केले. दीपक वाघमारे यांनी सूत्रसंचालन केले. मित्रावरून झांबरे यांनी
आभार मानले.

हेही वाचा

‘राईझ अप’ महिला अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा; मिशिका चौबेला दुहेरी सुवर्णपदक

सावधान ! लहान मुले ताप, खोकल्याने बेजार; ह्या गोष्टी टाळा

Sakri Kidnapping : स्वत:च्या अपहरणाचा रचला कट, तरुणी आता संशयितांच्या यादीत

Back to top button