

पुणे : पुढारी वृत्तसेवा : 'अल निनो'च्या प्रभावामुळे राज्यात पावसाने पाठ फिरविली. काही भागांत पाऊस पडला मात्र यथातथाच. याचा परिणाम राज्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे यावर्षी राज्याच्या सहा विभागांतील धरणांचा पाणीसाठा सध्या 67.18 टक्क्यांवर आला आहे. मागील वर्षी याच दिवसात 88.24 टक्के पाणीसाठा होता. सध्या 21 टक्क्यांनी जलसाठा कमी आहे.
जलसाठे कमी झाल्यामुळे ऐन थंडीच्या दिवसांतच मराठवाडा, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील बहुतांश जिल्हे आणि शहरांमध्ये दहा ते पंधरा दिवसांतून एकदा पाणी येऊ लागले आहे. त्यामुळे नागरिकांचे पाण्यावाचून हाल सुरू झाले असून, स्थानिक पातळीवर जिल्हाधिकारी कार्यालयाकडून टँकरने पाणीपुरवठा करण्याची वेळ आली आहे. राज्यात जलसंपदा विभागाचे पुणे, नागपूर, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक आणि कोकण असे सहा विभाग आहेत. या सहा विभागाच्या अंतर्गत 2 हजार 595 लहान, मध्यम आणि मोठी धरणे आहेत. राज्यातील धरणे 100 टक्के भरलीच नाहीत.
पावसाळा संपून दोन महिन्यांचा कालावधी उलटला आहे. मात्र, या दोन महिन्यांतच धरणांमधील जलसाठा झपाट्याने कमी होत असल्याचे आकडेवारीवरून दिसून आले आहे. राज्यात जलसाठ्यात होत असलेली घट ही अतिशय चिंतनीय बाब आहे. त्याबाबत राज्य शासनाने वेळीच उपाययोजना करून त्यावर मार्ग काढणे गरजेचे आहे; अन्यथा पुढे उन्हाळ्याच्या दिवसात जलसंकट वाढण्याची भीती आहे.
हेही वाचा