पुणे : पुढारी वृत्तसेवा : महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर खून खटल्यात सीबीआयने सादर केलेले पुरावे खोटे असल्याचे लेखी म्हणणे आरोपी शरद कळसकर, संजीव पुनाळेकर व वीरेंद्र तावडे यांनी गुरुवारी न्यायालयापुढे मांडले. दरम्यान, तावडे याने सीबीआयचे विभागीय पोलिस अधिकारी चौहान यांना साक्ष देण्यासाठी न्यायालयात बोलावण्याची मागणी अर्जाद्वारे केली आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 19 डिसेंबर रोजी होणार असून, बचाव पक्षाला साक्षीदारांची यादी सादर करण्यास सांगण्यात आले आहे.
विशेष न्यायाधीश पी. पी. जाधव यांच्या न्यायालयात या खटल्याची सुनावणी गुरुवारी (दि. 30) झाली. तब्बल, दीड महिन्यांनंतर पुन्हा या खटल्याची सुनावणी सुरू झाली आहे. या वेळी न्यायालयाने आरोपींना जवळपास 300 पेक्षा अधिक प्रश्न विचारले. बहुतांश प्रश्नांची उत्तरे आरोपींनी 'नाही, 'माहिती नाही' अशी दिली. डॉ. नरेंद्र दाभोलकर खून प्रकरणात डॉ. वीरेंद्रसिंह तावडे, सचिन अंदुरे, शरद कळसकर, अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे या पाच जणांवर आरोप निश्चिती करण्यात आली आहे. यातील अॅड. संजीव पुनाळेकर आणि विक्रम भावे दोघेही जामिनावर बाहेर आहेत.
आतापर्यंत या प्रकरणात सीबीआयच्या वतीने 20 साक्षीदार सादर करण्यात आले. त्यांची उलटतपासणीही घेण्यात आली. यामध्ये किरण केशव कांबळे आणि विनय केळकर या प्रत्यक्षदर्शी साक्षीदारांसह ससूनच्या पोस्ट मार्टम विभागाचे डॉ. अजय तावरे, फिर्यादी नवनाथ रानगट, संजय साडविलकर, सोमनाथ धायडे आणि एस.आर सिंग यांची साक्ष नोंदविण्यात आली. सीबीआयने निश्चित केलेल्या सर्व साक्षीदारांची साक्ष आणि उलटतपासणी पूर्ण झाली आहे.
हेही वाचा