पुणे : पुढारी वृत्तसेवा : ससून सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाल्यानंतर तेथून पळून जाण्याचा प्लॅन ललित पाटील याने पलायनाच्या तीन महिन्यांपूर्वीच केला असल्याची माहिती गुन्हे शाखा युनिट दोनच्या पथकाने प्रथमवर्ग न्याय दंडाधिकारी ए. सी. बिराजदार यांच्या न्यायालयात गुरुवारी दिली. दरम्यान, ससून रुग्णालयातून पळून गेल्याच्या प्रकरणात ललित पाटील आणि सचिन वाघ (दोघे रा. नाशिक) यांना पुणे पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले. या वेळी न्यायालयाने ललित पाटील याला सात दिवसांची पोलिस कोठडी, तर सचिन वाघला दोन दिवसांची पोलिस कोठडी सुनावली आहे.
ड्रग तस्कर ललित पाटील याच्यावर बंडगार्डन पोलिस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. त्यामध्ये एक गुन्हा ड्रग तस्करी तर दुसरा गुन्हा न्यायालयीन कोठडीअंतर्गत ससून रुग्णालयात उपचार घेत असताना, तेथून पळून गेल्याप्रकरणी दाखल आहे. पहिल्या गुन्ह्यात त्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असून दुसर्या गुन्ह्यात ललित पाटीलसह त्याचा चालक सचिन वाघ याला अटक करत गुरुवारी प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी अमृत बिराजदार यांच्या न्यायालयात हजर करण्यात आले.
युक्तिवादादरम्यान सहायक सरकारी वकील नीलिमा इथापे- यादव म्हणाल्या की, सदर आरोपी एकमेकांच्या संपर्कात असल्याचे तांत्रिक विश्लेषणाच्या माध्यमातून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे गुन्ह्याचा कट त्यांनी नेमका कोठे व कसा रचला याबाबत चौकशी होणे गरजेचे असल्याचे सरकारी वकील इथापे-यादव यांनी न्यायालयास सांगितले.
ललित पाटील ससून रुग्णालयातून पळून गेला त्यावेळी सचिन वाघ त्याच्यासोबत होता.
दोघेही परराज्यात सोबतच गेले होते. मुंबई पोलिसांनी त्यांना बंगळुरू येथून अटक केली. दरम्यान, वाघ आणि ललित पाटील दोघे एकमेकांच्या संपर्कात होते. ललितला पळून जाण्याच्या कटात वाघने सहकार्य केले. पैसे आणि कार उपलब्ध करून दिली, त्यामुळे याप्रकरणी अधिक चौकशीसाठी त्यांच्या पोलिस कोठडीची मागणी सरकार पक्षाच्या वतीने करण्यात आली.
ससून रुग्णालयातून ड्रग तस्कर ललित पाटील पळून गेल्यानंतर कैद्यांचा वॉर्ड क्रमांक 16 वादाच्या भोव-यात सापडला. किरकोळ आजार असणार्या कैद्यांनाही महिनोन् महिने वॉर्डात आश्रय दिला जात असल्याचे आरोप झाले. या पार्श्वभूमीवर कैद्यांचे 'इनकमिंग' बंद करण्यात आले असून, सध्या वॉर्ड क्रमांक 16 बंद ठेवण्यात आला आहे. ललित पाटील 2 ऑक्टोबर रोजी ससून रुग्णालयातून पळून गेला. त्या वेळी नऊ आरोपी तीन ते नऊ महिन्यांपासून वॉर्ड क्रमांक 16 मध्ये तळ ठोकून असल्याचे वृत्त सर्वप्रथम दैनिक 'पुढारी'ने दिले.
राजकीय वरदहस्त आणि ससून तसेच कारागृह प्रशासनाच्या विशेष प्रेमामुळे कैदी कारागृहाऐवजी ससूनमध्ये राहणे पसंत करत असल्याचे समोर आले. दैनिक 'पुढारी'च्या वृत्तानंतर प्रशासन खडबडून जागे झाले आणि तीनच दिवसांमध्ये कैद्यांची पुन्हा कारागृहात रवानगी करण्यात आली. ललित पाटील प्रकरणात ससून आणि कारागृह प्रशासनाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले. त्यामुळे कैद्यांना अॅडमिट करून घेण्यावर ससून प्रशासनाने बंधने आणली. सध्या वॉर्ड क्रमांक 16 मध्ये एकही कैदी अॅडमिट नसून वॉर्डला कुलूप लावण्यात आले आहे. त्याचप्रमाणे, वॉर्ड दुस-या ठिकाणी हलवण्याच्या हालचालींनाही सुरुवात झाली आहे. डॉ. विनायक काळे हे अधिष्ठातापदी रुजू झाल्यावर कैदी वॉर्डबाबत काय निर्णय घेणार, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
हेही वाचा