पुणे : पुढारी वृत्तसेवा : राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमातून जास्तीत जास्त तपासण्या, रुग्णांचा शोध, औषधांची उपलब्धता आणि समुपदेशन या उपाययोजनांमुळे एचआयव्हीग्रस्त रुग्णांची संख्या घटताना दिसत आहे. यंदा राज्यात 23 लाख 41 हजार 119 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 8 हजार 366 व्यक्ती एचआयव्ही पॉझिटिव्ह आढळल्या. गेल्या वर्षी पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 14 हजार 346 होती.
शासनातर्फे 2021 ते 2026 या कालावधीसाठी एड्स नियंत्रण कार्यक्रमाचा पाचवा टप्पा सुरू करण्यात आला आहे. यामध्ये प्रतिवर्षी नवीन एचआयव्ही संसर्ग आणि आजारामुळे होणार्या मृत्यूंचे प्रमाण 80 टक्क्यांनी कमी करणे, एचआयव्ही आणि सिफिलिसचे संक्रमण निर्मूलन आदी उद्दिष्ट्ये बाळगण्यात आली आहेत. महाराष्ट्र राज्य एड्स नियंत्रण संस्थेअंतर्गत 78 अॅटिरिट्रोव्हायरल थेरपी केंद्रे आहेत. राज्यातील 34 जिल्ह्यांमधील एआरटी केंद्रांमध्ये रुग्णांना मोफत औषधे पुरवली जातात. मे 2017 च्या नवीन धोरणाप्रमाणे सर्व एचआयव्हीग्रस्त रुग्णांना एआरटी औषधांचा लाभ दिला जातो. सध्या राज्यात 2 लाख 36 हजार 25 व्यक्ती नियमित उपचार घेत आहेत.
एआरटीवर उपचार घेण्यातील सातत्य वाढवणे, प्रवासाचा वेळ आणि खर्च कमी करणे, मुख्य एआरटी केंद्रांचा भार कमी करणे यासाठी 34 जिल्ह्यांमध्ये 177 लिंक एआरटी केंद्रे स्थापन करण्यात आली आहेत. त्यामुळे रुग्णांना घराजवळील केंद्रांमधून औषधे घेणे शक्य झाले आहे.
हेही वाचा