Pune : अवकाळी पावसाने द्राक्षबागांचे नुकसान
इंदापूर : पुढारी वृत्तसेवा : द्राक्षबागांसह फळपीक लागवडीमध्ये अग्रेसर असणार्या इंदापूर तालुक्यातील निमगाव केतकी परिसरात अवकाळी पावसाने तडाखा दिल्याने द्राक्ष बागायतदारांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास रात्रीत झालेल्या पावसाने हिरावून घेतल्याने लाखोंचा तोटा शेतकर्यांना सहन करावा लागणार आहे. ऑगस्टमध्ये द्राक्षबागांचा काही शेतकर्यांनी बहार धरला होता. तो आता सहा ते सात दिवसांत तोडणीयोग्य होणार होता. साधारण 150 ते 170 रुपये प्रतिकिलो या दराने द्राक्ष विक्री झाली असती, अशी शेतकर्यांना आशा होती. प्रतिएकरी दहा ते बारा टन उत्पादन शेतकरी घेत असतात.
संबंधित बातम्या :
मात्र, अवकाळी पावसाने घाला घातल्याने त्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. द्राक्षमण्यांचे अक्षरश: दोन भाग झाले आहेत. द्राक्षाचे घड व मणी फुटल्याने हा निर्यातक्षम माल आता स्थानिक बाजारपेठेतदेखील विक्रीस नेता येणार नसल्याचे शेतकर्यांनी सांगितले.
निमगाव केतकीमधील दहा ते बारा एकर क्षेत्रातील तोडणीस आलेल्या द्राक्षबागेला याचा मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे. अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या द्राक्षबागांकडे कोणताही शासकीय अधिकारी फिरकला नसून शेतकर्यांनी याविषयी संताप व्यक्त केला आहे. नुकसानग्रस्त भागांची पाहणी करून पंचनामे करून शासनाने त्वरित मदत जाहीर करावी, अशी मागणी द्राक्ष उत्पादक शेतकरी अंकुश जाधव, संजय राऊत, उत्तम भोंग, पांडुरंग हेगडे आदीनी केली आहे.
दोन एकर द्राक्षबाग तोडणीयोग्य झाली होती. पाच-सहा दिवसांत द्राक्ष विक्रीसाठी तयार झाली असती. 20 ते 22 टन उत्पादन अपेक्षित होते. मात्र अवकाळी पाऊस झाल्याने 30 लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
– संजय महादेव राऊत, द्राक्ष उत्पादक शेतकरी, निमगाव केतकी