कोल्हापूर जिल्ह्यातील 1400 दूध संस्थांना अंतिम नोटिसा | पुढारी

कोल्हापूर जिल्ह्यातील 1400 दूध संस्थांना अंतिम नोटिसा

डी. बी. चव्हाण

कोल्हापूर : दूध संकलन कमी असलेल्या जिल्ह्यातील 1450 दूध संस्थांना अवसायनात का काढू नये, अशा आषयाच्या नोटिसा दुग्ध विभागाने पाठवल्या आहेत. यामुळे जिल्ह्यातील नेते व संचालक यांचे धाबे दणाणले आहेत. यातून बचाव करण्यासाठी संस्था चालकांनी विविध क्लुप्त्या करत दूध संकलन वाढविण्याचा केविलवाणा प्रयत्न सुरू केल्याचे समजते.

राज्याच्या पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभागाचे सचिव म्हणून तुकाराम मुंढे यांनी कार्यभार स्वीकारल्यानंतर त्यांनी दूध आणि दुग्ध विभागाच्या कामकाजाची साफसफाई सुरू केली आहे. मुंढे यांनी 50 लिटर दूध संकलन करणार्‍या संस्था बंदच करा, असे आदेश काढले आहेत. जर कार्यवाही झाली नाही तर अधिकार्‍यांवर कडक कारवाई केली जाईल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

जिल्ह्यात 6 हजारांपर्यंत दूध संस्था आहेत. यातील जवळपास 2 हजार संस्थांमध्ये 50 ते 70 लिटरच दूध संकलन होत आहे. सर्व्हेमध्ये मिळून आलेल्या कमी संकलन व बंद संस्था अवसायनात काढण्यासाठी दुग्ध विभागाचे तीन वर्षे प्रयत्न सुरू आहेत; पण हस्तक्षेपामुळे ही प्रक्रिया पुढे जात नसल्याचे चित्र आहे. आता कमी संकलन व बंद असणार्‍या 1450 दूध संस्था अवसायानात काढून त्या बंद करण्याच्या प्रक्रियेला गती मिळत आहे.

संस्थाचालकांच्या पळवाटा

नोटिसा आलेल्यांपैकी अनेकांनी संकलन वाढविण्यासाठी अन्य संस्थांकडून लागेल तेवढे दूध खरेदी करून आपल्या संस्थेच्या नावे संघाला पाठविण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. या पळवाटांना कसे रोखणार, हा प्रश्न आहे.

नोंदणी एकाकडे, तर दूध दुसर्‍या संघाला

50 लिटरच्यावर संकलन असणार्‍या काही दूध संस्थांनाही नोटिसा मिळाल्याची माहिती आहे. संस्थांची नोंदणी एका संघाकडे तर दूध मात्र दुसर्‍याचा संघाला, अशा संस्थांचा यात समावेश असल्याचे समजते. त्यामुळे संकलनात गोंधळ दिसत असल्याने त्या संस्थांना अवसायनाची नोटीस लागू झाली आहे. काही संस्था संघाचे सभासद कायम ठेवण्यासाठी 10 ते 20 लिटर दूध पुरवठा करून इतर दूध खासगी विक्री किंवा इतर संघांना पुरवठा करतात, अशा संस्थांनाही नोटीस मिळाली आहे.

Back to top button