

पिंपरी : पुढारी वृत्तसेवा : महापालिकेच्या नवीन थेरगाव रुग्णालयाच्या पाठीमागे चारचाकी वाहनांसाठी असलेल्या पार्किंगजवळच्या जागेत कचरा, राडारोडा साचला आहे. त्याच्या साफसफाईकडे रुग्णालय प्रशासनाच्या वतीने दुर्लक्ष केले जात आहे. त्याचप्रमाणे, रुग्णालयाने उभारलेल्या सीमाभिंतीने परिसरातील रहिवाशांना ये-जा करण्यासाठी असलेला मुख्य रस्ता बंद पडला आहे.
संबंधित सीमाभिंत काढून नागरिकांसाठी हा रस्ता पूर्ववत सुरू करावा, अशी मागणी रहिवाशांनी केली आहे. रुग्णालयाच्या पाठीमागे चारचाकी वाहनांसाठी असलेल्या पार्किंगच्या जागेजवळ विद्युत खांब पडलेले आहेत. त्याचप्रमाणे, येथे राडारोडा आणि कचरा साचला आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. पर्यायाने रुग्णालयाजवळ राहणार्या नागरिकांना त्याचा त्रास होत आहे.
रुग्णालय प्रशासनाने उभारलेल्या सीमाभिंतीच्या बाजूला राहणार्या नागरिकांसाठी सध्या ये-जा करण्यासाठी एकच रस्ता शिल्लक राहिला आहे. सीमाभिंतीमुळे त्यांचा दुसरा रस्ता बंद झाला आहे. सध्या असलेला रस्ता अरुंद आहे. येथे अग्निशामक दलाचे वाहन, अॅम्ब्युलन्स आल्यानंतर आतील बाजूस वळविण्यासाठी पुरेशी जागा नाही. पर्यायाने, आपत्कालीन परिस्थितीत समस्या उद्भवू शकते.
नवीन थेरगाव रुग्णालयाजवळ काही नागरिकांनी अतिक्रमण करून घरे बांधलेली आहेत. रुग्णालयाने बांधलेल्या सीमाभिंतीच्या बाजूला विकास आराखड्यातील रस्ता अस्तित्वात नाही. येथे रुग्णालयासाठी आरक्षण टाकलेले आहे.
– नितीन निंबाळकर, कार्यकारी अभियंता, महापालिका
हेही वाचा