

नारायणगाव : पुढारी वृत्तसेवा : तालुक्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरीवर्गाचे हाल झाले. त्याचबरोबर साखर कारखान्यांच्या ऊसतोडणीचा हंगाम सुरू असल्याने ऊसतोडणी मजुराचीदेखील हाल झाले. त्यांच्या कोप्यामध्ये पाणी गेल्याने त्यांचे मोठ्या प्रमाणात हाल झाल्याचे दिसून आले. ऊसतोडणी मजुरांनी राहण्यासाठी पाचटाच्या कोप्या केल्या आहेत. अचानक आलेल्या पावसामुळे सगळे पाणी कोप्यात गेले. त्यांची लहान मुलेदेखील पावसात भिजत होती. विजांचा कडकडाट होत असल्यामुळे ऊसतोडणी मजूर आपल्या कच्च्या-बच्चांना छातीला कवटाळून देवाचा धावा करत होते. अचानक आलेल्या पावसामुळे ऊसतोडणी मजुरांची झालेली तारांबळ पाहून विघ्नहर साखर कारखान्याने तातडीने उपलब्ध असलेल्या प्लास्टिक कागदाच्या ताडपत्री या मजुरांसाठी उपलब्ध करून दिल्या.
दरम्यान, या अवकाळी पावसाने कांदा, द्राक्ष, बटाटे, केळी या पिकांचेदेखील नुकसान झाले. उसाचे पीकदेखील अनेक ठिकाणी भुईसपाट झाले आहे. मका त्याचबरोबर जनावरांची इतर चार्याची पिके भुईसपाट झाली आहेत. दरम्यान, जुन्नर तालुक्यामध्ये झालेल्या गैरमोसमी पावसामुळे पिकांच्या झालेल्या नुकसानीचे शासनाने तात्काळ पंचनामे करावेत, अशी मागणी शेतकरीवर्गाकडून करण्यात येत आहे.
आ. बेनके यांच्याकडून तात्काळ दखल
याबाबत जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ पंचनामा करा, अशा सूचना कृषी विभाग आणि तहसीलदार यांना दिल्या असल्याचे त्यांनी सांगितले. ते म्हणाले, जुन्नर तालुक्यामध्ये भात, द्राक्ष, केळी, कांदा, मका, कांद्याची रोपे आदी पिकांचे नुकसान झाले आहे. याबाबत जिल्हाधिकारी राजेश देशमुख यांनादेखील पीक नुकसानीची कल्पना दिली असून, त्यांनी तातडीने पंचनामे करण्याबाबत कनिष्ठ अधिकार्यांना सूचना करा, असे सांगितले आहे.
हेही वाचा :