नाशिक : पुढारी वृत्तसेवा-जिल्ह्याला दणका देणाऱ्या अवकाळी पावसाचा जोर सोमवारी (दि.२७) ओसरला. बहुतांश तालुुक्यांमध्ये पावसाने उघडीप दिल्यानंतर शेतातील पिकांचे डोळ्यासमोर भयावह चित्र आल्याने मन सुन्न झाले. दरम्यान, हवामान विभागाच्या इशाऱ्यानुसार पुढील २४ तास जिल्ह्याला येलो अलर्ट असणार आहे.
उत्तर महाराष्ट्रात गेल्या दोन दिवसांपासून अवकाळी पावसाच्या सरी बरसत आहेत. त्यातच रविवारी (दि.२६) नाशिक जिल्ह्याला अवकाळीसह गारपिट व वादळी वाऱ्याने अक्षरक्ष: झोडपून काढले. अवघ्या काही तासांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे शेतीपिकांचे अतोनात नुकसान झाले. तसेच जिवितहानी व काही ठिकाणी मालमत्तांना हानी पोहचली आहे. परिणामी सर्वत्र चिंतेचे वातावरण आहे. अशातच जिल्ह्याला सोमवारी (दि.२७) पावसाचा येलो अलर्ट होता. पण सकाळच्या सत्रात काही काळ रिमझिम ते हलक्या सरी पडल्या. त्यानंतर दिवसभर ढगाळ हवामान असले तरी पावसाने विश्रांती घेतल्याने जिल्हावासीयांनी सुटकेचा नि:श्वास साेडला.
जिल्ह्यात गेल्या चोवीस तासांमध्ये अवकाळी पाऊस तसेच वीज अंगावर पडल्याने सात जनावरे गतप्राण झाली. त्यामध्ये तीन म्हशी, दोन बैल तसेच प्रत्येकी एक गाय व वासराचा समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात सोमवारी (दि.२७) सकाळी आठपर्यंत संपुष्टात आलेल्या २४ तासांमध्ये सरासरी २७.८ मिमी पर्जन्याची नोंद झाली आहे.
हेही वाचा :