
पुणे : शहरात सोमवारी सायंकाळी व उत्तर रात्री धो-धो पाऊस झाला. सर्वाधिक पाऊस बालेवाडी भागात झाला असून, तेथे 24 तासांत 50 मिलिमीटर पावसाची नोंद झाली, तर शिवाजीनगर भागात 6.9 मि.मी.ची नोंद झाली. शहरात अजून दोन दिवस असा पाऊस राहील, असा अंदाज पुणे वेधशाळेने वर्तवला आहे. सोमवारी पावसाने विश्रांती घेतली, तरीही शहरात दिवसभर पावसाळी वातावरण तयार झाले होते. रविवारी शहरात रात्री 7.30 च्या सुमारास धो-धो पावसाला सुरुवात झाली.
शहरातील सर्वच रस्त्यांवर पाणी साचले होते. या पावसाने विजांच्या कडकटासह जोरदार हजेरी लावल्याने नागरिकांची तारांबळ उडाली होती. रविवारी रात्री 9 वाजता पावसाचा जोर थांबला. पण, पुन्हा रात्री 11 नंतर पाऊस सुरू झाला. उत्तर रात्री 2 वाजेपर्यंत मुसळधार पाऊस पडत होता. शहरातील सर्व पेठांसह उपनगरांत डबकी साचली. शहरावर ढगांची गर्दी झाली. आर्द्रताही वाढल्याने गारठा वाढला.
सोमवारचा दिवस उजाडला तो ढगाळ वातावरणाने… सकाळी 11 पर्यंत शहरावर दाट धुक्याची चादर होती. नंतर उन्ह पडल्याने गारठा कमी झाला. रस्त्यावरचे पाणीही कमी झाले.
चोवीस तासांत पुणे शहरासह संपूर्ण जिल्ह्यात जोरदार पावसाने हजेरी लावली. यात निमगिरीत 67 मिलीमिटर इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. रविवारी शहरासह जिल्ह्यात मुसळधार पाऊस झाला. सायंकाळी 7.30 वाजता पावसाला सुरुवात झाली. नंतर रात्री 9 वाजता पाऊस थांबला. मात्र रात्री 11 ते पहाटे 2 पर्यंत पाऊस सुरुच होता. जिल्ह्यात निमगिरी येथे 67 मी.मी इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली. 24 तासांत झालेला पाऊस (मिमी): निमगिरी 67, बालेवाडी 50,खेड 34.5, एनडीए 17.5, हडपसर 16.7, ढमढेरे 16.5, चिंचवड 12, लवळे 8, हवेली 6.5, पाषाण 6.5, शिवाजीनगर 5.1.
हेही वाचा