सावधान! धूूम्रपान, चूल, डासांची कॉईलमुळे सीओपीडीचा धोका

सावधान! धूूम्रपान, चूल, डासांची कॉईलमुळे सीओपीडीचा धोका

पुणे : सतत लाकडांची चूल पेटवून त्यावर स्वयंपाक करणे, सतत सिगारेट, बिडीचे झुरके ओढणार्‍यांसह घरांत डासांची कॉईल लावत असाल तर सावधान. हे सतत करणार्‍या नागरिकांना सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) (दम्याच्या पुढच्या) आजाराचा धोका आहे. शहरातील तेरा झोपडपट्ट्यांत फिरून एक सर्वेक्षण करण्यात आले. त्यात हा निष्कर्ष शास्त्रज्ञांनी काढला आहे.

पुणे शहरातील शहरी झोपडपट्ट्यांसह ग्रामीण भागातील काही ठिकाणांचा अभ्यास करण्यात आला. पुणे शहरातील 13 झोपडपट्ट्यांमध्ये सुमारे 3 हजार तर ग्रामीण भागातील तेव्हढ्याच लोकांना भेटून त्यांची वैद्यकीय चाचणी करून हा शोधनिबंध मांडण्यात आला. यात तीस वर्षांवरील स्त्री-पुरुषांना सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठी आमंत्रित करण्यात आले होते. लेखी संमती मिळाल्यानंतर 13 प्रशिक्षित समुदाय, आरोग्य कर्मचार्‍यांनी एक प्रश्नावली केली. यात 6 हजारपैकी 5 हजार 420 (48 टक्के) रहिवाशांनी संमती देत सर्व प्रश्नांची उत्तरे दिली. यात 38 टक्के पुरुषांचा समावेश होता. डॉ. डी. डी. घोरपडे, डॉ. ए. रघुपती, डॉ. जे. डी. लोंढे यांनी पुणे शहरासह आजूबाजूच्या ग्रामीण वस्तीत जाऊन हा शोधनिबंध मांडला आहे.

नेमका काय आहे आजार व लक्षणे?

फुफ्फुसाकडे जाणारी श्वसननलिका अरुंद होत जाते. श्वसननलिकेच्या तळाशी चंबूसारखा भाग असतो. तेथे रक्तात ऑक्सिजन मिसळतो. या आजारामुळे त्या चंबूची आकुंचन व प्रसरण क्षमताच कमी होते, हवा अडकते त्यामुळे दम लागतो. तज्ज्ञांच्या मते, यातच अनेक गुंतागुंतीचे आजार आहेत. त्यांना लंग्ज फायब—ोसिस म्हणतात. रुग्ण खाली बसला की त्रास होत नाही, मात्र चालताना त्याला खूप दम लागतो.

53 दशलक्ष लोक आजाराने प्रभावित

सीओपीडी (क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज) हे जगातील मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. जगातील सुमारे 300 दशलक्ष लोकांना या आजाराने प्रभावित केले आहे. भारतातही ते मृत्यूचे दुसरे प्रमुख कारण म्हणूून हा आजार ग्रामीण भागात जास्त आढळतो. तर शहरात झोपडपट्टी भागात आढळतो आहे. देशात सुमारे 53 दशलक्ष लोकांना या आजाराने प्रभावित केले आहे. ग्लोबल बर्डन ऑफ डिसीजच्या डेटानुसार, मलेरिया, टीबी, एचआयव्ही आणि डायबिटीजपेक्षा जास्त मृत्यू या आजाराने होत आहेत. भारतातील सीओपीडीचा वेग खूप जास्त आहे, कारण प्रचंड वेगाने वाढणारी लोकसंख्या हे एक कारण आहे. तंबाखूचे धूम—पान, चूलीचा धूर, डासांच्या कॉइलचे ज्वलन, घरातील इतर प्रदूषक वायू आणि घराबाहेरचे प्रदूषण यामुळे सुरुवातीला दमा होतो. नंतर त्याचे पुढे सीपीओडी आजारात रूपांतर होऊ शकते.

सीओपीडी आजाराची माहिती नाही…

या सर्वेक्षणात असे आढळले की, शहरातील नागरिकांपैकी 49 टक्के लोकांनी 'सीओपीडी' हा शब्दच पहिल्यांदा ऐकल्याचे समजले. तर ग्रामीण भागातील 90 टक्के लोकांना हा शब्दच माहीत नसल्याचे निदर्शनास आले. अनेकांनी या आजाराचे वर्णन हृदयविकार, दमा, असे केले. तर 20 टक्के लोकांनी धूर, प्रदूषणामुळे हा आजार होत असल्याची शक्यता व्यक्त केली. भारतीय लोकांमध्ये या आजाराची माहिती व जागरुकतेची पातळी अत्यंत कमी असल्याचे या शोधनिबंधात नमूद केले आहे. या आजारावर राष्ट्रव्यापी जनजागृती कार्यक्रम राबवण्याची गरज असल्याचा सल्ला यात देण्यात आला आहे.

दररोज या आजाराचे खूप रुग्ण येत आहेत. केवळ गरिबीमुळे बरेच लोक डॉक्टरकडे येत नाहीत. हा
आजार पूर्ण बरा होत नाही. त्यावर उपचार घेऊन तो आटोक्यात ठेवता येतो. सोप्या भाषेत सांगायचे तर हा दम्याच्या पुढचा आजार आहे. दमा आजारावर उपचार घेतले नाही तर सीपीओडी आजार होऊ शकतो.
-डॉ. संजय राजकुंटवार, फॅमिली फिजिशियन

देशात 95 टक्के लोकांचे निदान नाही…

भारतात या आजाराचा प्रसार वेगाने होत असून, अजूनही 95% पेक्षा जास्त रुग्णांचे निदान झालेले नाही. कमी निदानामुळे उपचार कमी होतात. ज्यामुळे विकृती आणि मृत्युदरात आणखी वाढ होते. सीओपीडीशी संबंधित मृत्यू आणि त्रास कमी करण्यासाठी निदान आवश्यक आहे. गरिबीमुळे लोकांना त्रास होत असूनही लोक दवाखान्यात जात नाहीत. त्यामुळे त्याचे निदानच होत नाही, असाही दावा शोधनिबंधात करण्यात आला आहे.

शुक्रवारचे हवाप्रदूषण मीटर

  • शिवाजीनगर:225(खराब)
  • विद्यापीठ रस्ता :106(मध्यम)
  • म्हाडा कॉलनी:155(मध्यम)
  • कर्वे रस्ता 80 (चांगली)
  • कात्रज:94(चांगली)

प्रमुख चार शहरे

  • दिल्ली :235 ते 393(अति खराव)
  • पुणे: 70 ते 225 (चांगली, मध्यम, खराब)
  • मुंबई :63ते 115(मध्यम)
  • अहमदाबाद: 55 ते 117 (मध्यम)

हेही वाचा

logo
Pudhari News
pudhari.news