विकास निधीचे ढपले पाडणार्‍या बोक्यांना हद्दपार करा | पुढारी

विकास निधीचे ढपले पाडणार्‍या बोक्यांना हद्दपार करा

राजेंद्र जोशी

कोल्हापूर : कोल्हापुरात खड्डेमय झालेल्या रस्त्यांच्या पुनर्बांधणीसाठी 100 कोटी रुपयांच्या निधीचा प्रकल्प मार्गी लागतो आहे. शहराच्या तीर्थक्षेत्र विकासाच्या प्रकल्पानेही गती घेतली आहे. काही प्रकल्पांचे प्रस्ताव केंद्र शासनाच्या अखत्यारित, तर काही प्रकल्प राज्य शासनाकडे मंजुरीच्या प्रतीक्षेत आहेत. या प्रकल्पांनी कोल्हापूरच्या विकासाच्या पुनर्रपहाटेची चाहूल दिली असली, तरी या प्रकल्पासाठी उपलब्ध झालेल्या निधीतून एका छदामाचाही ढपला पाडला जाणार नाही, याविषयी कोल्हापूरकरांनी सतर्क होण्याची गरज आहे.

कोल्हापूरच्या विकासाला ढपल्याचे मोठे ग्रहण आहे. यामुळेच शहरातील विकासकामे एक तर मार्गी लागत नाहीत आणि मार्गी लागली, तर ढपल्यामुळे प्रकल्पाचा दर्जा अत्यंत सुमार होतो. या पार्श्वभूमीवर ढपला पाडणार्‍या लोकप्रतिनिधींना आम्ही मतदान करणार नाही, अशी ताठ भूमिका कोल्हापूरकरांनी घेतली, तर क्षमता असूनही विकासापासून दूर राहिलेल्या कोल्हापूरचे नंदनवन होण्यास वेळ लागणार नाही.

कोल्हापूर राज्याच्या प्रमुख शहरांच्या यादीमध्ये प्रारंभापासूनच पहिल्या पाच क्रमांकामध्ये होते. परंतु, लोकप्रतिनिधींची उदासीनता, प्रशासकीय अनास्था आणि उत्तरोत्तर वाढलेली ढपल्यांची संस्कृती यामुळे कोल्हापूर विकासापासून दूर राहिले. कोल्हापूरला नागरिकांनी सरकारच्या खजिन्यात कररूपाने जमा केलेल्या रकमेच्या तुलनेत मुळातच कमी निधी येतो आणि उपलब्ध झालेल्या निधीचे प्रत्येक टप्प्यावर ढपले पाडले जातात. यामुळे प्रत्यक्ष विकासकामांसाठी निधी तोकडा पडतो. या निधीतून प्रस्तावित प्रकल्पाच्या स्पेसिफिकेशनप्रमाणे दर्जा राखता येत नाही आणि निधी खर्ची पडूनही नागरिकांना त्या दर्जाच्या सुविधा मिळत नाहीत. या सर्व गोष्टींना तराजूतून खव्याची वाटणी करणार्‍या बोक्यांच्या गोष्टीप्रमाणे ढपले जबाबदार आहेत. जोपर्यंत हे ढपले पाडणार्‍यांना बोक्यांच्या पाठीत जनमताची काठी बसत नाही, तोपर्यंत हे बोके वठणीवर येणार नाहीत. शिवाय, पैसे खर्चून, मते विकत घेऊन निवडून यायचे आणि निवडून आल्यानंतर ढपले पाडून खर्च केलेल्या पैशांची दामदुप्पट वसुली करायची, ही अनिष्ट परंपरा बंद होणे अशक्य आहे.

कोल्हापुर शहरातील रस्त्यांसाठी गेल्या पाच वर्षांमध्ये कोट्यवधी रुपये खर्ची पडले. पण, नागरिकांना रस्त्यावरून एक खड्डा चुकविण्याच्या प्रयत्नात दुसर्‍या खड्ड्यात जावे लागते. ही स्थिती कोणामुळे आली? या रस्त्यांच्या कामांवर प्रशासनाचे चोख नियंत्रण असते आणि ढपल्यापासून ही कामे दूर राहिली असती, तर शहरात रस्त्यांच्या दोषदुरुस्तीची हमी दिलेली 201 कामे पुन्हा करण्याची नोटीस प्रशासनाला काढावी लागली नसती. पण, पावसाचे कारण दाखवून रस्ते खराब झाल्याचे सध्या सांगितले जाते आहे. हे कारण वरकरणी आहे. जेथे सर्वाधिक पाऊस पडतो, तेथेही दोन वर्षांमध्ये पुन्हा रस्ते करावे लागल्याची उदाहरणे नाहीत. मग कोल्हापुरातच हे रस्ते का बिघडतात? त्याला पाऊस हे एकमेव कारण नाही. ढपले आणि जागोजागी केली जाणारी वाटमारी यामुळे रस्ते बिघडले आणि नागरिकांचे कंबरडे मोडले.

कोल्हापूर आणखी मागे जाण्याचा धोका

कोल्हापूरकर हे किती दिवस सहन करणार आहेत? अवघ्या राज्यामध्ये ताठ बाण्याचे कोल्हापूरकर अशी ओळख आहे. मोडेन पण वाकणार नाही, ही जर कोल्हापूरची परंपरा असेल, तर ढपले आणि प्रलोभने यांना मूठमाती देण्यासाठी सज्ज झाले पाहिजे. अन्यथा कोल्हापूरच्या विकासाच्या नावाखाली ढपलेवाल्यांचा विकास होऊन पात्रता असलेले कोल्हापूर आणखी मागे रेटले जाण्याचा धोका आहे.

Back to top button