कोल्हापूर : ऊस आंदोलकांवर 42 गुन्हे; 450 जणांची नावे निष्पन्न | पुढारी

कोल्हापूर : ऊस आंदोलकांवर 42 गुन्हे; 450 जणांची नावे निष्पन्न

कोल्हापूर, पुढारी वृत्तसेवा : स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात विविध पोलिस ठाण्यांत 42 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संघटनेच्या प्रमुख व पदाधिकार्‍यांसह 450 आंदोलकांची नावे निष्पन्न झाली आहेत. अडीच हजारांवर अनोळखी कार्यकर्त्यांचाही त्यामध्ये समावेश असल्याची माहिती पोलिस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी शनिवारी दिली.

ऊस दराच्या मागणीसाठी स्वाभिमानी संघटनेच्या 22 दिवसांच्या आंदोलन काळात रास्ता रोकोसह वाहनांचे टायर जाळण्याच्या घटना घडल्या आहेत. अप्पर जिल्हाधिकार्‍यांनी जारी केलेल्या जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून पुणे-बंगळूर महामार्गावर चक्का जाम आंदोलन केले होते. आंदोलनामुळे जिल्ह्यात प्रमुख मार्गावरील वाहतुकीमध्ये विस्कळीतपणाही आला होता, असेही ते म्हणाले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते, माजी खासदार राजू शेट्टी यांच्यासह 450 आंदोलकांची नावे निष्पन्न झाली आहेत. उर्वरित अडीच हजारांवर आंदोलकांची नावे निष्पन्न करून त्यांच्याविरुद्ध कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. आंदोलन काळात वाहनांची तोडफोड, टायर जाळण्याच्या घटनांमुळे सुमारे 5 लाखांचे नुकसान झाल्याचेही त्यांनी सांगितले. नुकसान झालेल्यांना काही साखर कारखान्यांच्या व्यवस्थापनाने आर्थिक सहाय्य केल्याचेही त्यांनी सांगितले.

पोलिस यंत्रणा रात्रंदिवस कर्तव्यावर

आंदोलनात जिल्ह्यात शांतता-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलिस यंत्रणेने कमालीची दक्षता घेतली होती. जिल्ह्यात दोन हजारांवर पोलिस रात्रंदिवस डोळ्यात तेल घालून कर्तव्यावर होते. अप्पर पोलिस अधीक्षक निकेश खाटमोडे- पाटील, पोलिस उपअधीक्षक, जयसिंगपूर, शिरोळ, कुरुंदवाड, हुपरी, शिरोली एमआयडीसी, कोडोली पोलिस ठाण्यातील प्रभारी अधिकारी, पोलिस, जिल्हा विशेष शाखेचे पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, आर्थिक गुन्हे शाखेचे निरीक्षक रवींद्र कळमकर, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे निरीक्षक महादेव वाघमोडे यांच्यासह अन्य अधिकार्‍यांनी खबरदारी घेतल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचेही पोलिस अधीक्षकांनी सांगितले.

Back to top button