Pune News : शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांचा ठिय्या! | पुढारी

Pune News : शिक्षक भरतीसाठी पात्रताधारकांचा ठिय्या!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : गेल्या सहा वर्षांपासून प्रतीक्षा असलेल्या शिक्षक भरती प्रक्रियेला यंदा मुहूर्त लागेल, असे वाटत असतानाच परीक्षा होऊन नऊ महिने उलटले तरी ही प्रक्रिया अद्यापही संथगतीने चालू आहे. त्यामुळे राज्यातील अभियोग्यता धारकांमध्ये असंतोष वाढला असून, त्यातील काही उमेदवारांनी सेंट्रल बिल्डिंग येथे बेमुदत उपोषण सुरू केले आहे.

शिक्षक भरतीसाठी राज्य शासनाच्या शिक्षण विभागाकडून फेब—ुवारी 2023 म्हणजे तब्बल नऊ महिन्यांपूर्वी शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी परीक्षा घेण्यात आलेली होती. तसेच त्याचा निकालही त्याच वेळी जाहीर करण्यात आला आहे. मात्र, असे असले तरी अद्यापही ही प्रक्रिया पूर्ण झालेली नसून एकाच टप्प्यात 80 टक्के पदांची जाहिरात देऊन तत्काळ ही प्रक्रिया पूर्ण करावी, उमेदवारांच्या भाषेचे माध्यम न बघता निवड गुणवत्तेनुसार करण्यात यावी. यासह अनेक मागण्यांसाठी पुणे येथील शिक्षण आयुक्त कार्यालयाबाहेर डी.एड., बी.एड. स्टुडंट असोसिएशन या संघटनेच्या वतीने अभियोग्यताधारकांनी आंदोलन सुरू केले आहे.

गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी राज्यात 30 हजार शिक्षकांच्या पदभरतीची घोषणा केली होती. तसेच ही प्रक्रिया तत्काळ राबवली जाईल, असेही त्यांनी त्या वेळी नमूद केले होते. मात्र, शिक्षकांअभावी अनेक शाळा बंद पडत असतानाही राज्य सरकारकडून या प्रक्रियेला वेग येत नसल्याने शिक्षक भरतीकडे आस लावून बसलेल्या उमेदवारांचा हिरमोड झाला आहे.

अनुदानीत, अंशतः अनुदानीत व अनुदानास पात्र घोषित प्राथमिक, उच्च प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधील शिक्षण सेवकांच्या रिक्त पदावर भरती करण्यासाठी अभियोग्यता व बुध्दीमत्ता चाचणीचे परिपत्रक 31 जानेवारी 2023 रोजी काढले व प्रत्यक्ष परिक्षा दिनांक 22 फेब्रुवारी ते 3 मार्च पर्यंत घेण्यात आली होती. मात्र त्यानंतर तब्बल 9 महिने उलटले असले तरी फक्त स्वप्रमाणपत्राची कार्यवाही पूर्ण झाली आहे. पोर्टलची प्रक्रिया अतिशय संथगतीने सुरू असून, पवित्र पोर्टलवर जाहिराती व प्राधान्यक्रम उपलब्ध करून देण्यात आलेले नाहीत. त्यामुळे गुणवत्ता धारण करणारा उमेदवार नोकरीपासून वंचित राहिला आहे.

हेही वाचा

लवंगी मिरची : फेक; पण डीपफेक!

कोल्हापूर : ऊस दराच्या कोंडीला जबाबदार कोण?

Pune News : आरोग्य योजनांचा लाभ अत्यल्प

Back to top button