Pune News : आरोग्य योजनांचा लाभ अत्यल्प | पुढारी

Pune News : आरोग्य योजनांचा लाभ अत्यल्प

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आरोग्यविषयक योजनांविषयी सामान्यांमध्ये जनजागृती झालेली नाही. प्रत्यक्ष लाभ मिळालेल्या नागरिकांचे प्रमाण 3 ते 5 टक्के इतके अत्यल्प आहे. सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अँड रिसर्चने केलेल्या सर्वेक्षणातून ही धक्कादायक माहिती समोर आली आहे. सर्वेक्षणात पुण्यातील 6 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील 13 वस्त्यांमधील 650 नागरिकांना सहभागी करून घेण्यात आले होते.
अभ्यासात सहभागी झालेल्या 650 नागरिकांपैकी 177 व्यक्तींनी (27%) शहरी गरीब वैद्यकीय साहाय्य योजनेबाबत माहिती असल्याचे सांगितले.

यापैकी 161 (25%) व्यक्तींनी प्रधानमंत्री मातृवंदना योजना, 134 (21%) व्यक्तींनी आयुष्यमान भारत योजना, 100 (15%) लोकांनी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि 49 (8%) लोकांनी धर्मादाय योजनेविषयी माहिती असल्याचे सांगितले.
अभ्यासात सहभागी झालेल्या 650 नागरिकांपैकी 79 टक्के असंघटित स्वरूपाच्या कामांमध्ये आहेत. तर, केवळ 11 टक्के सहभागी नियमित पगाराच्या कामात असलेले दिसून आले. फक्त 10 टक्के सहभागींनी कुटुंबाचे उपजीविकेचे साधन हे स्वयंरोजगार असल्याचे नोंदवले आहे.

आरोग्यविषयक योजनांच्या सद्यस्थितीबाबत सेंटर फॉर अ‍ॅडव्होकसी अँड रिसर्चतर्फे सार्वजनिक आरोग्य विभागातील अधिकारी आणि प्रतिनिधींसमोर अभ्यास सादरीकरण केले. या वेळी योजना जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी धोरणात्मक बदलांची आणि जनजागृतीची गरज असल्याचा सूर चर्चेतून उमटला. या वेळी सिफारचे तृष्णा कांबळे, ज्योती शेळके, आनंद बाखडेम, शंकर गवळी, अश्विनी खंदारे उपस्थित होते. दीपक जाधव यांनी शासकीय विभागाच्या अधिकारी आणि प्रतिनिधींशी संवाद साधला.

आरोग्यविषयक योजनांची स्थिती (टक्केवारी)

  • नाव                                        जनजागृती     लाभ
  • धर्मादाय रुग्णालय योजना                  8            2
  • आयुष्यमान भारत योजना                 21           3
  • महात्मा फुले जनआरोग्य योजना        15           3
  • प्रधानमंत्री मातृवंदना योजना              25          5
  • शहरी गरीब योजना                         27          9

उपाययोजना काय ?

  • आरोग्य योजनांचे सोशल ऑडिट व्हावे
  • योजनांचे बजेट वेळोवेळी काढण्यात यावे आणि वाढीव बजेटची तत्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.
  • शासकीय कार्यालयांतर्गत सक्षम तक्रार निवारण यंत्रणा असावी.
  • आरोग्य योजना लाभार्थ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी विविध प्रकारे प्रचार आणि प्रसार व्हावा.
  • योजना लागू असलेल्या रुग्णालयांमध्ये दर्शनी भागात योजनांची माहिती ठळकपणे लावली जावी.
  • दवाखान्यात उपचारांसाठी दाखल होत असतानाच रुग्णांच्या नातेवाइकांना दवाखान्यात लागू असणा-या सर्व शासकीय योजनांची
  • माहिती देण्यात यावी.
  • कागदपत्रांच्या अडचणींमुळे लाभ घेण्यात अडथळा आल्यास सोयीस्कर मार्ग काढण्यात यावेत.

हेही वाचा

Nashik News | श्री शिवमहापुराण कथेद्वारे धर्माचा प्रचार-प्रसार : खासदार श्रीकांत शिंदे

Nashik News : अखेर गंगापूर, दारणातून जायकवाडीला पाणी

जळगाव : तीन वाहनांच्या विचित्र अपघातात ३ जण ठार

 

Back to top button