Weather Update : आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज | पुढारी

Weather Update : आजपासून 3 दिवस मोठ्या पावसाचा अंदाज

पुणे : पुढारी वृत्तसेवा : मालदिव ते महाराष्ट्र असा भला मोठा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने शुक्रवार ते रविवार असा तीन दिवस राज्यातील बहुतांश भागांत मोठ्या पावसाचा अंदाज आहे. विजांच्या गडगडाटासह हलका ते मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज हवामान विभागाने दिला आहे. रविवारी (दि. 26) कोकण व मध्य महाराष्ट्राला मुसळधार पावसाचा अंदाज देण्यात आला आहे.

मालदिवपासून दक्षिण महाराष्ट्राच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात गुरुवारी सायंकाळपासून गार वारे वाहू लागले आहेत. शुक्रवारपासून बहुतांश भागांत मेघगर्जना अन् विजांच्या कडकडाटासह हलका ते मध्यम पाऊस पडेल, असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे.

पश्चिमी चक्रवातामुळेही पाऊस वाढणार

गुरुवारी उत्तरेत नवीन पश्चिमी चक्रवात तयार झाल्याने 25 व 26 नोव्हेंबर रोजी गुजरात-महाराष्ट्र-गोवा किनारपट्टीपासून पूर्व मध्य अरबी समुद्रापर्यंत वार्‍याचा वेग वाढणार आहे. त्यामुळे कोकण व मध्य महाराष्ट्रात पाऊस 29 नोव्हेंबरपर्यंत वाढणार आहे. 27 रोजी उत्तराखंडमध्ये काही ठिकाणी गारपीट, तर दक्षिण अंदमान समुद्र आणि आजूबाजूच्या परिसरात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे.

अंदमानात नव्या चक्रीवादळाची शक्यता

या वातावरणामुळे 25 नोव्हेंबर रोजी दक्षिण अंदमानवर कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता असून, त्याचे रूपांतर चक्रीवादळात होऊ शकते. ते वादळ 26 नोव्हेंबरच्या आसपास पश्चिम-वायव्य दिशेने सरकण्याची शक्यता आहे. त्यामुळे वार्‍याचा वेग ताशी 50 ते 65 कि.मी. इतका वाढण्याची शक्यता आहे.

तापमान घटले

राज्याच्या तापमानात गुरुवारी सायंकाळी मोठी घट झाली. किमान तापमानाचा पारा 18 वरून 14 अंशांपर्यंत खाली आला होता. मालदिव ते महाराष्ट्र असा कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याने राज्यात बाष्पयुक्त ढगांचा प्रवास सुरू झाला आहे. त्यामुळे गुरुवारी सायंकाळी किमान तापमानात 4 ते 5 अंशांनी घट झाली. गुरुवारी जळगावचा पारा राज्यात सर्वात कमी 14 अंशांवर खाली आला होता.

राज्यातील तापमान

जळगाव 14, पुणे 15.6, नगर 16, कोल्हापूर 20, महाबळेश्वर 15.9, नाशिक 15, सांगली 20, सातारा 18, सोलापूर 21.8, धाराशिव 20, छत्रपती संभाजीनगर 16.6, परभणी 18, नांदेड 18.4, बीड 19, अकोला 17, अमरावती 18, बुलडाणा 17, चंद्रपूर 17, गोंदिया 17.4, नागपूर 16.6, यवतमाळ 16.

हेही वाचा

भाजपच्या माजी आमदाराविरोधात त्यांच्याच मुलीने थोपटले दंड

निपाणी शहर बनतेय गांजा तस्करीचे केंद्र

निपाणी शहर बनतेय गांजा तस्करीचे केंद्र

Back to top button