भाजपच्या माजी आमदाराविरोधात त्यांच्याच मुलीने थोपटले दंड | पुढारी

भाजपच्या माजी आमदाराविरोधात त्यांच्याच मुलीने थोपटले दंड

अलवर; वृत्तसंस्था : राजस्थानात अलवर ग्रामीण मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या विरोधात त्याच्याच मुलीने निवडणुकीच्या रिंगणात उडी घेतली आहे. माजी आमदार जयराम जाटव यांच्याविरोधात त्यांची मुलगी मीना कुमारी यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. आपल्याला मुलगी म्हणून वडिलांनी कायम छळले, तू मुलगी असल्यामुळे माझे नशीब बिघडले, असा आरोप ते करायचे, असा दावाच मीना कुमारी यांनी केला आहे.

अनुसूचित जातीसाठी राखीव असलेल्या अलवर ग्रामीण मतदार संघात भाजपकडून माजी आमदार जयराम जाटव निवडणूक लढवत आहेत. त्यांना त्यांच्या घरातूनच यावेळी आव्हान मिळाले आहे. त्यांची मुलगी मीना कुमारी ही अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरली आहे. मीना कुमारी यांनी सांगितले की, जन्मल्यापासून वडिलांनी कायम सापत्नच वागणूक दिली आहे. माझा जन्म झाला म्हणून त्यांचे वाईट दिवस आले, असा त्यांचा समज झाला.

Back to top button