निपाणी शहर बनतेय गांजा तस्करीचे केंद्र

निपाणी शहर बनतेय गांजा तस्करीचे केंद्र

निपाणी; पुढारी वृत्तसेवा : गेल्या वर्षभरात सातत्याने निपाणीमध्ये गांजासारखे अंमली पदार्थ मोठ्या प्रमाणात सापडले आहेत. कोगनोळी टोलनाका ते निपाणीपर्यंत भाग गांजा तस्करीचा हॉटस्पॉट बनला असून निपाणी पोलिसांकडून गेल्या वर्षभरात केलेल्या विविध कारवाईमुळे तब्बल 10 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे. शिवाय 8 जणांना गजाआड करण्यात आले आहे.

सीमाभागाचा फायदा घेत खास करून तरुणपिढी या व्यवसायात मोठ्याप्रमाणात पाय रोवत असल्याचे चिंताजनक आहे. पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाला लागून निपाणी हे सीमाभागातील प्रमुख शहर आहे. शहराला लागूनच 1 किमीवर महाराष्ट्राची हद्द सुरू होते.
निपाणीतील उपनगराचा विचार केल्यास महाराष्ट्र आणि कर्नाटकमध्ये केवळ तारेचे कुंपणच पाहावयास मिळते. निपाणीत वाढलेले गांजाविक्रीचे प्रमाण धक्कादायक आहे. महाराष्ट्र-कर्नाटक पोलिसांच्या हद्दीचा मुद्दा विचारात घेत तस्करांनी निपाणी हे गांजाचे प्रमुख केंद्र बनवले आहे. बुधवारी घटनेतील तरुण हा कोल्हापुरातील आहे. सातत्याने केवळ निपाणीतच गांजा सापडतो. पोलिस यंत्रणेचा वरदहस्त असल्याशिवाय या गोष्टी शक्य नाहीत, असा आरोपही नागरिकांतून करण्यात येत आहे. निपाणीत चोर्‍या, खून, हाणामारी, दागिने लुटीचे प्रकार सातत्याने वाढत असल्याचे दिसत आहेत. त्यामुळे निपाणी शहर आता असुरक्षित वाटू लागले आहे. उभ्या पिकामध्ये आंतरपीक म्हणून अशा गांजाची शेतीही करण्यात येत आहे. गांजा हा कागदी पुढीमध्ये बांधून विकला जात आहे. कोणाला समजत नसल्याने हा व्यवसाय वाढत आहे.

ठोस कारवाई नाही

निपाणीमध्ये गांजा येण्यासाठी इचलकरंजी, मुरगूड, नानीबाई चिखली (ता. कागल), गडहिंग्लज, आजरा, चंदगड असे वेगवेगळे मार्ग आहेत. या रस्त्यावरून गांजाची आयात होते. गांजा तस्करी करणार्‍यांवर ठोस कारवाई होत नसल्यामुळेही निपाणी शहरात गांजा विक्री वाढत असल्याचा आरोप स्थानिकांतून करण्यात येत आहे.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news