Pune : हवेलीतील 11 गावांत सापडल्या 3,488 कुणबी नोंदी

Pune : हवेलीतील 11 गावांत सापडल्या 3,488 कुणबी नोंदी
Published on
Updated on

वेल्हे : पुढारी वृत्तसेवा : हवेली तालुक्यात कुणबी नोंद शोध मोहिमेला वेग आला आहे. आतापर्यंत 11 गावांत 3 हजार 488 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. सर्वाधिक कुणबी नोंदी गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये सापडत आहेत. तर आतापर्यंत राज्यात सर्वाधिक 30 हजारांहून जास्त कुणबी नोंदी एकट्या हवेलीत सापडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. हवेली तालुक्यात 134 गावे आहेत, त्यापैकी केवळ 11 गावांतील जन्म-मृत्यू रजिस्टरची आतापर्यंत तापासणी करण्यात आली आहे.

संबंधित बातम्या :

धायरी, खडकवासला, मालखेड आदी 11 गावांच्या जन्म-मृत्यू रजिस्टरच्या 45 हजार 412 दस्तांत 3 हजार 488 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. उर्वरित 123 गावांच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्येही मोठ्या प्रमाणात कुणबी नोंदी असल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे.
याशिवाय शिक्षण विभागाने केलेल्या गावोगावच्या मराठी शाळांतील दाखल रजिस्टरच्या तपासणीत 833 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. शिक्षण विभागाने तब्बल 1 लाख 444 कागदपत्रांची तपासणी केली. तालुक्यात आतापर्यंत 4 हजार 321 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. हवेली तहसील कार्यालयातील रेकॉर्ड रूममध्ये असलेल्या गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये कुणबी नोंदीचा खजिना असल्याचे पाहून अधिकारार्‍यांसह मोडी वाचक अचंबित झाले.

सरसकट कुणबी
सिंहगडच्या डोंगरी खोर्‍यासह शहरासभोवताली हवेली तालुक्याचा विस्तार आहे. बि—टिश राजवटीपासून तहसील रेकॉर्ड रूममध्ये असलेल्या गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये 1830 पासून 1925 पर्यंत मराठ्यांच्या जातीचा उल्लेख सरसकट कुणबी म्हणून आहे.

राज्यात सर्वाधिक नोंदींमुळे युद्धपातळीवर शोध मोहीम
कुणबी नोंदीच्या कागदपत्रांचा मोठा खजिना हवेलीत असल्याने प्रशासनाने युद्धपातळीवर शोध मोहीम सुरू केली आहे. बहुतांश कागदपत्रे मोडी लिपीत आहेत. त्यामुळे मोडीवाचकांनी या शोध मोहिमेत सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

बहुतेक दफ्तर मोडी लिपीत
ब्रिटिश राजवटीतील गावोगावच्या जन्म-मृत्यू रजिस्टर तसेच इतर कागदपत्रांत कुणबी नोंदी आहेत. बहुतेक दफ्तर मोडी लिपीत आहे. डॉ. नंदकुमार मते, प्रकाश मळेकर, कोंढरे, धावडे आदी मोडी वाचक स्वयंस्फूर्तीने शोध मोहिमेत सहभागी झाले आहेत.

नायब तहसीलदारांसह 8 कर्मचारी, 5 मोडी वाचक कार्यरत
हवेली तालुका तहसीलदार किरण सुरवसे यांच्या मार्गदर्शनाखाली कुणबी नोंद शोध कक्षात नायब तहसीलदारांसह 8 कर्मचार्‍यांसह 5 मोडी वाचक कागदपत्रांची तपासणी करीत आहेत. गावोगावच्या 1830 पासूनच्या जन्म-मृत्यू रजिस्टरमध्ये 1925 पर्यंत मराठ्यांच्या जातीचा उल्लेख कुणबी म्हणून सरसकट सापडत आहे. त्यानंतर बहुतेक ठिकाणी कुणबीऐवजी मराठा जात असा उल्लेख आहे. जन्म-मृत्यू रजिस्टरप्रमाणे ब्रिटिश राजवटीतील जनगणना, गॅझेट, भूमी अभिलेख विभागातील दस्तऐवज, शिवकालीन सनद वतन तसेच विविध विभागांतील कागदपत्रांची तपासणी करण्यात येणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news