सतलज नदीत संशोधकांना सापडला अत्यंत दुर्मीळ धातू! | पुढारी

सतलज नदीत संशोधकांना सापडला अत्यंत दुर्मीळ धातू!

नवी दिल्ली; वृत्तसंस्था : आयआयटी रोपडच्या संशोधकांनी पंजाबमधील सतलज नदीत अत्यंत दुर्मीळ असा धातू शोधून काढला आहे. टँटॅलम नावाच्या या धातूचा इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांमध्ये वापर केला जातो.

आयआयटीच्या नागरी अभियांत्रिकी विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. रश्मी सेबास्टियन यांच्या नेतृत्वाखालील संशोधकांना हे यश आले. सतलज नदीच्या वाळूत हा धातू सापडला असून, त्याचे प्रमाण नेमके किती आहे, यावर आता संशोधन सुरू झाले आहे. वास्तविक हे संशोधक एका वेगळ्याच प्रकल्पावर काम करीत होते. परंतु, अपघाताने त्यांना टँटॅलम धातू सापडला. हा धातू अत्यंत दुर्मीळ असून त्याचा आण्विक क्रमांक (अ‍ॅटोमिक नंबर) 73 आहे. म्हणजे एवढे प्रोटॉन्स त्यात आहेत. राखाडी रंगाचा हा धातू वजनदार, अत्यंत टणक आणि सर्वाधिक गंजरोधी आहे. टँटॅलमइतका गंजरोधक इतर कोणताही धातू नाही, असे संशोधकांनी सांगितले. केंद्र सरकारच्या खाण मंत्रालयाने 2020-21 मध्ये 12 अत्यंत दुर्मीळ आणि महत्त्वाच्या खनिजांच्या यादीत टँटॅलमचा समावेश आहे. डॉ. सेबास्टियन म्हणाल्या की, हिमालय पर्वतराजीतील भूगर्भातील हालचालींचा परिणाम म्हणून हे खनिज सतलज नदीत आले असावे, असा अंदाज आहे.

धातू नदीत कसा आला?

डॉ. सेबास्टियन यांच्या गटाने जुलै 2021 मध्ये हे संशोधन केले होते. ते यंदा जानेवारी महिन्यात प्रसिद्ध करण्यात आले. त्यानंतर त्यावर पंजाब सरकारच्या खनिकर्म विभागाला ते पाठविण्यात आले. याच विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. रीत कमल तिवारी यांनी हा प्रस्ताव सरकारला दिला आहे. त्या म्हणाल्या, अधिक संशोधनाशिवाय या धातूच्या उगमाविषयी काहीही सांगता येणार नाही. सतलजच्या आसपास कोणताही उद्योग नाही. त्यामुळे उद्योगातून हा धातू नदीत समाविष्ट झाला असण्याची शक्यता नाही. सतलजचे 80 टक्के पाणलोट क्षेत्र चीन आणि तिबेटमध्ये आहे. तेथूनही हा धातू नदीत मिसळला गेला असावा, असा अंदाज आहे.

Back to top button