प्रवाशांची लूट सुरूच ! पॅसेंजर गाड्यांनाही मेल एक्सप्रेसचे भाडे | पुढारी

प्रवाशांची लूट सुरूच ! पॅसेंजर गाड्यांनाही मेल एक्सप्रेसचे भाडे

उमेश कुलकर्णी

दौंड : रेल्वे प्रशासनाने कोरोना काळात पॅसेंजर गाड्यांना मेल एक्सप्रेसचा दर्जा देऊन त्याप्रमाणे वाढीव भाडे आकारणी सुरू केली होती. परंतु, कोरोना संपून जवळपास तीन वर्षे होत आली, तरी रेल्वे प्रशासनाने प्रवाशांची लूट कायमच ठेवली आहे. दौंडहून पुण्याला सुटणारी सकाळी सात वाजून पाच मिनिटांची शटल या गाडीला वीस रुपयाचे तिकीट आकारले जाते, परंतु त्यानंतर सुटणार्‍या सर्व पॅसेंजर गाड्यांना 45 रुपये इतके तिकीट आकारले जाते. याबाबत रेल्वे प्रशासनाकडे दौंड-पुणे प्रवासी संघ, खासदार सुप्रिया सुळे यांनी तिकिटाचे दर कमी करावेत व प्रवाशांची होणारी लूट थांबवावी म्हणून पत्रव्यवहार केला आहे. परंतु रेल्वे काहीही करण्यास तयार नाही.

संबंधित बातम्या :

रेल्वे प्रशासनाला काही केल्या फरक पडत नसल्याने आगामी काळात ‘रेल रोको’ सारखे आंदोलन होण्याची शक्यता आहे. रेल्वे अधिकारी ‘रेल रोको’चा दम भरला की तात्पुरत्या स्वरूपात जुजबी आश्वासने देऊन वेळ मारून नेतात. एकदा काही वेळ निघून गेला की या प्रश्नाकडे कोणताही रेल्वे अधिकारी लक्ष देत नाही.

सध्या सुट्ट्यांचे दिवस असून, सर्वच रेल्वेगाड्यांना मोठ्या प्रमाणात गर्दी आहे. प्रवाशांना बसण्याकरिता पुरेशी आसन व्यवस्था नसल्यामुळे प्रचंड त्रासाला सामोरे जावे लागत आहे. दौंडचे रेल्वे प्रशासन इतके मुजोर आहे की पुण्याहून सुटणारी तीन वाजताची डेमो लोकल सायंकाळी पाच वाजता दौंड रेल्वे स्थानकात प्लॅटफॉर्म क्रमांक चारवर दूर उभी करतात. यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना प्रचंड त्रास होतो. वास्तविक प्लॅटफॉर्म क्रमांक तीन हा या वेळी रिकामा असतो, परंतु तांत्रिक कारणे देत जाणूनबुजून ही गाडी दूरवर उभी केली जाते. या संदर्भात अनेकदा रेल्वे प्रशासनाला सांगूनही यावर कोणतीही उपाययोजना केली जात नाही.

दौंड रेल्वे स्थानकातील अधिकारी इतके मुजोर झाले आहेत, की त्यांच्याकडे एखादा प्रवासी तक्रार करण्यास गेला, तर आमच्याकडे तक्रार बुक उपलब्ध नाही, असे बेजबाबदारपणे उत्तर देतात, मग प्रवाशांनी दाद मागायची तरी कोणाकडे? या मुजोर अधिकार्‍यांना रेल्वे प्रशासन पाठीशी का घालते, याचे पाणी कुठे मुरते, हे वरिष्ठ अधिकारी पाहत नाही का? असे प्रश्न दौंडकरांना पडले आहेत. दौंड हे रेल्वेचे महत्त्वाचे जंक्शन असूनही या रेल्वे स्थानकावर पूर्वीप्रमाणे प्रवाशांना चांगल्या सोयीसुविधा नाहीत. त्यामुळे प्रवाशांना मोठ्या मनस्तापाला सामोरे जावे लागते.

दौंड रेल्वे स्थानकावर गाडीची वाट पाहण्याकरिता उभ्या असणार्‍या प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या जवानांकडून (आरपीएफ) अनेकदा त्रास दिला जातो. काही वेळेस रेल्वेमधून प्रवास करताना बाहेरून जेवणाची ऑर्डर दिली असल्यास हॉटेलचे जे कर्मचारी जेवण देण्याकरिता रेल्वे स्टेशनवर येतात, त्यांच्याकडून आरपीएफचे जवान तपासणीच्या नावाखाली दमदाटी करून त्यांच्या जवळचे पैसे काढून घेतात. याबाबत जर कोणी तक्रार देण्याचा प्रयत्न केला, तर त्यांच्यावरच खोट्या केसेस दाखल करण्याची धमकी देतात. आरपीएफच्या विरोधात कोणी तक्रार देण्यास पुढे येत नाही.

मागील पंधरा दिवसांपूर्वी दौंड शहरातून मुंबई- हैदराबाद एक्सप्रेसला जेवण देण्याकरिता गेलेल्या तीन जणांकडून आरपीएफ कर्मचार्‍यांनी तीन हजार रुपये काढून घेतल्याची घटना घडली आहे. याबाबत त्यांच्याकडे तक्रार करण्यात गेले असता अधिकार्‍यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, याची रेल्वे प्रशासनाने दखल घेणे गरजेचे आहे. अन्यथा दौंड रेल्वे स्थानकावर या आरपीएफ जवानांचा हैदोस वाढल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे.

Back to top button