Pune Drugs Case : …तर ड्रग्ज तस्करी वाढली असती | पुढारी

Pune Drugs Case : ...तर ड्रग्ज तस्करी वाढली असती

पुणे : पुढारी वृत्तसेवा : पुण्यातील ससून रुग्णालयातून ड्रग्जचे रॅकेट चालविणार्या ललित पाटील याचे पुणे पोलिसांनी पुण्यातील पहिल्याच एमडी या अमली पदार्थाची डील उघड केले. हे डील वेळेवर उघड झाले नसते तर कारागृहातून बाहेर आल्यानंतर ललितने ड्रग्ज तस्करीच्या माध्यमातून हैदोस घातला असता. ही कारवाई झाल्यानेच त्याचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज माफिया होण्याचे स्वप्न भंगल्याचे सूत्रांनी सांगितले. ललित कारागृहात असताना अकरणात अटक केलेल्या काही परदेशी आणि विविध तस्करांशी संपर्कात आला असल्याचेही आता बोलले जात आहे.

त्यानंतर त्याने एमडीची तस्करी मुंबई, महाराष्ट्रासह देशात व परदेशात करण्याचा फ्लॅन केला होता. तो वैद्यकीय कारण देऊन चाकणच्या गुन्ह्यातून जामिन मिळविणार होता. त्यानंतर एमडीची तस्करी परदेशात करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. त्याने काही वर्षांपूर्वी शेळी व बकर्या एक्सपोर्ट करण्याचा व्यवसाय सुरू केला होता. त्याचा परवाना देखील काढला होता. या एक्सपोर्टच्या माध्यमातून तो तस्करी करण्याबाबत त्याचा प्लॅन ठरला असल्याची दाट शक्यताही वर्तवली जात आहे. त्याने हे सर्व काही डोक्यात तयार ठेवले होते.

देशाबाहेर व्यवसायाचा प्लॅन

मुंबई, पुण्यानंतर तो देशात व देशाबाहेर एमडीचा सप्लाय करण्याच्या विचारात होता. तसा प्लॅनही त्याने आखला होता. पुण्यातून नाशिकमध्ये उत्पादित होणारे आणि मुंबईत विक्री होणारे रॅकेटचा पर्दाफाश करत ललित पाटील, अरविंद लोहरे या दोन मास्टर माईंडसह 14 जणांच्या मुसक्या आवळल्या आहेत. पुण्यातून एक डील फिक्स केली. पण ती डील पुर्ण करतानाच त्याला पुणे पोलिसांनी पकडले आणि रॅकेटचा पर्दाफाश झाला. त्यामुळे ललितचे आंतरराष्ट्रीय ड्रग्ज तस्कर होण्याचेही स्वप्न भंगल्याचे सूत्रांनी सांगितले.

ललित पाटीलची ससूनमध्ये पुन्हा वैद्यकीय तपासणी

ड्रग तस्कर ललित पाटील प्रकरणात दररोज नवनवे धागेदोरे समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी ललितचा ताबा घेतल्यानंतर त्याला प्राथमिक वैद्यकीय तपासणीसाठी ससून, रुग्णालयात आणले होते. त्यानंतर, 19 नोव्हेंबर रोजी पुन्हा पाटीलची ससूनमध्ये तपासणी करण्यात आली. मात्र, अ‍ॅडमिट करून न घेता पुन्हा पोलिसांच्या ताब्यात घेण्यात आले. ललित पाटील पळून जाण्यापूर्वी चार महिन्यांपासून ससून रुग्णालयात पंचतारांकित सुविधा उपभोगत होता. पोलिस आणि डॉक्टरांच्या मदतीने रुग्णालयातून त्याचा ड्रगचा व्यवसाय सुरळीत सुरू होता. आर्थिक हितसंबंधांमुळे कोणताही गंभीर आजार नसतानाही ससून प्रशासन आणि येरवडा कारागृहाच्या वरिष्ठांच्या वरदहस्ताने त्याने ससूनमध्ये तळ ठोकला होता.

हेही वाचा

वुली मॅमथ पुन्हा होणार जिवंत?

Pune News : कचरा जाळल्यामुळे वायु प्रदूषणाला आमंत्रण

एक लाख वर्षांपूर्वी चप्पल घालत होता माणूस!

Back to top button