वुली मॅमथ पुन्हा होणार जिवंत? | पुढारी

वुली मॅमथ पुन्हा होणार जिवंत?

लंडन : प्रागैतिहासिक काळातील एक लुप्त झालेली प्रजाती म्हणजे वुली मॅमथ. हे केसाळ हत्ती हिमयुगाचे एक प्रतीकच आहेत जे काळाच्या ओघात विविध कारणांमुळे नामशेष झाले. त्यांचे अनेक अवशेष, जीवाश्म सापडलेले आहेत. आता या प्रजातीला पुनर्जिवित करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या प्राण्यांचा डीएनए आशियाई हत्तींबरोबर मिसळून एका पिल्लाला जन्माला घालण्याचे हे प्रयत्न आहेत. बायोटेक कंपनी ‘कोलोसल बायोसायन्स’च्या वैज्ञानिकांनी दावा केला आहे की 2028 पर्यंत हा प्रयोग यशस्वी होईल.

या कंपनीच्या म्हणण्यानुसार मॅमथचे भ्रूण सरोगेट हत्तीणीच्या गर्भाशयात स्थापित केले जाईल व त्या माध्यमातून हे पिल्लू जन्माला येईल. या प्रयोगाला अनेकांनी विरोधही केला आहे. त्यांचे मत आहे की अशा प्राण्यांना पुनर्जिवित करणे धोकादायक ठरू शकते. मॅमथच्या बर्फाळ प्रदेशात सापडलेल्या अवशेषातील डीएनएचा यासाठी वापर केला जाणार आहे. हे प्राणी 8.8 ते 11.5 फूट उंचीचे होते. त्यांचे वजन 3.9 ते 8.2 मेट्रिक टन दरम्यान होते. नवजात पिल्लाचे वजनच 90 किलो होते. हे वुली मॅमथ अतिशय थंड हवामानाला सरावलेले होते. शेवटच्या हिमयुगात हे प्राणी अस्तित्वात होते. त्यांच्या शरीरावरील दाट केसांमुळे किंवा लोकरीमुळे त्यांचा थंडीपासून बचाव होत असे.

Back to top button