Sports News : महिलांच्या ‘राईझ अप’ क्रीडा स्पर्धेचा पुन्हा थरार | पुढारी

Sports News : महिलांच्या ‘राईझ अप’ क्रीडा स्पर्धेचा पुन्हा थरार

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय स्पर्धेच्या दुसर्‍या हंगामाला सुरुवात झाली असून,
दिवाळीनंतर पुन्हा एकदा महिलांच्या क्रीडा स्पर्धांचा थरार रंगणार आहे. दै. ‘पुढारी’च्या वतीने पुणे शहर, जिल्हा आणि पिंपरी-चिंचवड भागातील खेळाडूंना प्रोत्साहन आणि खेळाचे व्यासपीठ मिळवून देण्याच्या उद्देशाने ‘राईझ अप’ पुणे महिला क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.

मागील वर्षी सुरू झालेल्या फक्त महिलांसाठी सुरू केलेल्या ‘राईझ अप’ या क्रीडा स्पर्धांच्या उपक्रमाच्या सिझन 2 ची सुरुवात या वर्षी सप्टेंबर महिन्यात बुद्धिबळ, कॅरम स्पर्धेने झाली होती. त्यानंतर महिलांच्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धाही उत्साहात पार पडल्या. महाराष्ट्रात अशा प्रकारची केवळ महिलांसाठी स्पर्धा घेणारा दै. ‘पुढारी’ हा एकमेव माध्यम समूह आहे.

दोन दिवसीय जलतरण स्पर्धा

दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय जलतरण स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धा शनिवार, दि. 25 नोव्हेंबर आणि रविवार, दि. 26 नोव्हेंबर अशा दोन दिवस होणार आहेत. ही स्पर्धा पुणे डिस्ट्रीक्ट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅक्वेटिक असोसिएशनच्या सहकार्याने कर्वे रोड येथील टिळक टँकवर ही स्पर्धा होणार असून, या स्पर्धेत पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथून मोठ्या प्रमाणात महिला जलतरणपटूंनी सहभाग नोंदविला आहे.

तीन दिवसीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा

दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धा रंगणार आहेत. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट अ‍ॅमॅच्युअर अ‍ॅथलेटिक असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने होणार असून, मंगळवार दि. 28 नोव्हेंबर, बुधवार दि. 29 नोव्हेंबर आणि गुरुवार दि. 30 नोव्हेंबर या तीन दिवसांमध्ये शेकडो मुली सहभागी होणार आहेत. पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथील अनेक शाळांमधील खेळाडूंनी आपला उत्स्फूर्त सहभाग नोंदविला असून, या स्पर्धा स्व. बाबूराव सणस मैदानावर रंगणार आहेत. या स्पर्धेची नाव नोंदणी सुरू असून दि. 26 नोव्हेंबर पर्यंत ही नाव नोंदणी सुरू राहणार आहे. या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी खेळाडूंनी हर्षल निकम 9923182171 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन या वेळी करण्यात आले आहे.

डिसेंबरमध्ये रंगणार टेबल टेनिस स्पर्धा

दै. ‘पुढारी’च्या वतीने ‘राईझ अप’ पुणे महिला जिल्हास्तरीय टेबल टेनिस स्पर्धा होणार आहे. या स्पर्धा पूना डिस्ट्रिक्ट टेबल टेनिस असोसिएशनच्या सहकार्याने शनिवार दि. 2 आणि रविवार दि. 3 डिसेंबर असे दोन दिवस होणार असून, या स्पर्धा प्रभात रोड येथील सिंबायोसिस स्कूलच्या सिंबायोसिस स्पोर्ट्स सेंटर येथे होणार आहेत. या स्पर्धेमध्ये पुणे शहर, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीण येथून खेळाडू सहभागी होणार असून, अद्यापही नावनोंदणी सुरू आहे.

या स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी अंतिम तारीख दि. 30 नोव्हेंबरपर्यंत संधी असून, मधुकर लोणारे 9423576782 यांच्याशी संपर्क साधावा. या ‘राईझ अप’ सिझन 2 साठी माणिकचंद ऑक्सिरिच हे मुख्य प्रायोजक असून, सहप्रायोजक म्हणून रुपमंत्रा, मीडिया प्रायोजक म्हणून झी टॉकीज, एज्युकेशन पार्टनर म्हणून सूर्यदत्ता इन्स्टिट्यूट आणि सपोर्टिंग पार्टनर म्हणून पुणे महानगरपालिका यांचे विशेष सहकार्य मिळाले आहे. या स्पर्धेच्या अधिक माहितीसाठी अतुल मगर 9822441953 यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

हेही वाचा

स्थिर रेपो रेटचे सुपरिणाम!

नागपूर : दहा हजार किलो मसाले भाताचा दरवळ!

आयटी कर्मचार्‍यांचे काम, सप्ताहात पन्नास तास थांब!

 

Back to top button