नागपूर : दहा हजार किलो मसाले भाताचा दरवळ! | पुढारी

नागपूर : दहा हजार किलो मसाले भाताचा दरवळ!

नागपूर; पुढारी वृत्तसेवा : आपल्या घरी पाहुणे येणार म्हटल्यावर झटपट तयार होणारा आणि सर्वांना आवडणारा खमंग पदार्थ म्हणजे मसाले भात. तो कधी एक-दोन पायलीचा म्हटले तरी खूप झाले. या पार्श्वभूमीवर, नागपुरात मंगळवारी प्रसिद्ध शेफ विष्णू मनोहर यांनी आदिवासी मेळाव्यासाठी आलेल्या सुमारे 25 हजार बांधवांसाठी तब्बल दहा हजार किलोचा मसाले भात बनवला. साहजिकच तो चर्चेचा विषय बनला.

येथील ईश्वर देशमुख शारीरिक शिक्षण महाविद्यालयात आयोजित आदिवासी मेळाव्याला 25 हजार लोकांची उपस्थिती जमेला धरून हा भात तयार करण्यात आला. याची प्रक्रिया सोमवारी रात्री साडेदहापासून सुरू झाली. विष्णू जी की रसोई या ठिकाणी कडक थंडीत चुली पेटल्या आणि विष्णू मनोहर आणि त्यांच्या टीमने पुढील कामाला सुरुवात केली. तेल, तांदुळ, कांदे, बटाटे आदी साहित्य कढईत पडत गेले, तसा घमघमाट सुटू लागला. अखेर मंगळवारी सकाळी सात वाजण्याच्या सुमारास भल्यामोठ्या कढईत वाफाळता मसाले भात तयार झाला.

खाद्ययात्रेतील अनेक विक्रम मी केले आहेत. मात्र, यावेळी कोणत्याही विक्रमासाठी नव्हेतर सेवाभावी उपक्रमात आपलेही योगदान असावे, अशी भावना समोर ठेवून मी आणि माझ्या टीमने हा मसाले भात साकारला.
विष्णू मनोहर, प्रसिद्ध शेफ

Back to top button