अत्यल्प पावसामुळे मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ | पुढारी

अत्यल्प पावसामुळे मेंढपाळांवर स्थलांतराची वेळ

खोर : पुढारी वृत्तसेवा :  यंदा दौंड तालुक्यात पुरेसा पाऊस पडला नाही. अत्यल्प पावसामुळे सर्वांचेच कंबरडे मोडले आहे. शेतकरीवर्गापासून ते अगदी मेंढपाळांना याचा मोठा फटका बसला आहे. पाऊस नसल्याने डोंगर माथ्यावरील चारादेखील लवकर संपुष्टात आला. त्यामुळे दौंडच्या दक्षिण भागातील मेंढपाळांनी यंदा उन्हाळा सुरू होण्याच्या आधीच स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यंदाच्या पावसाळ्यात ऑगस्टपर्यंत पाऊसच झाला नाही. सप्टेंबरमध्ये पावसाने थोडी हजेरी लावली. झालेला पाऊस समाधानकारक नसल्याने खरीप वाया गेला. रब्बीवरही याचा परिणाम जाणवत आहे. दौंड तालुक्याच्या दक्षिण भागात पाऊस न झाल्याने खोर, देऊळगावगाडा या भागातील मेंढपाळ शेळ्या – मेंढ्यांसह कोकणात स्थलांतर करू लागले आहेत.

दरवर्षी फेब्रुवारी ते मार्चदरम्यान ते कोकणाकडे स्थलांतर करतात. यंदा चारा, पाणी लवकर संपुष्टात आल्याने नोव्हेंबरमध्येच स्थलांतराला सुरुवात झाली आहे. कोकण, मावळ पट्टा मेंढपाळांसाठी उपयुक्त मानला जातो. वर्षातील आठ महिने या भागात मेंढपाळ उपजीविका करतात. केवळ चार महिनेच ते दौंडच्या ग्रामीण भागात वास्तव्यास येतात. यंदा अपुर्‍या पावसामुळे त्यांना आपला मुक्काम लवकर हलवावा लागला आहे. डोंगरमाथ्यावरील गवत वाळले असून ओढे, तलाव, नाले, विहिरीदेखील आटले आहेत. त्यामुळे मेंढपाळांनी चार्‍यासाठी कोकण, मावळ भागाकडे स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे.

हेही वाचा :

Back to top button