Pune News : कल्व्हर्ट, पूल झाले अनधिकृत पार्किंग | पुढारी

Pune News : कल्व्हर्ट, पूल झाले अनधिकृत पार्किंग

पुणे : पुढारी वृत्तसेवा : आंबिल ओढ्याला आलेल्या पुरानंतर महापालिकेने शहरातील विविध ओढ्यांवरील कल्व्हर्ट मोठे करण्याचे काम हाती घेतले असून, अनेक कल्व्हर्टची कामे पूर्णही केली आहेत. मात्र, या कल्व्हर्टवर मोठ्या प्रमाणात अनधिकृतपणे वाहने पार्क केली जात असल्याने वाहतुकीला अडथळा होत आहे. शहराच्या पश्चिम भागात झालेल्या ढगफुटीमुळे 25 सप्टेंबर 2019 रोजी आंबिलओढ्यासह लहान मोठ्या ओढ्यांना आणि नाल्यांना पूर आला होता. रात्रीच्या वेळी आंबिल ओढ्याने रौद्ररूप धारण केल्याने ओढ्याच्या परिसरातील कात्रज तलाव, बालाजी नगर, इंदिरा नगर, केके मार्केट, अरण्येश्वर पद्मावती, पर्वती, बागुल उद्यान, मित्रमंडळ चौक, लक्ष्मी नगर, दांडेकर पूल परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचे पाणी शिरले.

या संकटामध्ये काही लोकांना प्राण गमवावे लागले, वाहनांचे नुकसान झाले, अनेक वाहने वाहून गेली होती. या दुर्घटनेनंतर महापालिकेने ओढ्याची सीमाभिंत बांधणे, गाळ काढले, ओढ्याचे पात्र रुंद करणे, नुकसान झालेले रस्ते व कल्व्हर्ट दुरुस्त करणे, कमी उंचीच्या कल्व्हर्टची उंची व रुंदी वाढवणे, अशी कामे करण्याचे काम केले. यापैकी बर्‍यापैकी काम पूर्ण झाले असून, काही ठिकाणी कल्व्हर्टची कामे सुरू आहेत. मात्र, ज्या ठिकाणी काम पूर्ण झाले आहे, अशा कल्व्हर्टवर रहिवाशांकडून दोन्ही बाजूंना वाहने पार्किंग केली जातात. अनेक कल्व्हर्टवर बंद पडलेली व गंजलेली वाहने धुळखात पडून आहेत. याकडे महापालिका आणि वाहतूक पोलिसही सोयीस्करपणे दुर्लक्ष करत असल्याने वाहतुकीला व नागरिकांना ये-जा करण्यास अडथळा होत आहे.

भिडे पूल, टिळक पुलावर दुतर्फा वाहने

नदीपात्रातील रस्त्यावर बाबा भिडे पूल ते महापालिकेसमोरील टिळक पूल या दरम्यान दोन्ही बाजूला मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने पार्क केली जातात. या वाहनांचा अडथळा निर्माण होऊन दोन्ही पुलांच्या टोकांना वारंवार वाहतूक कोंडी होते. आता मागील काही महिन्यांपासून बालगंधर्व रंगमंदिराजवळील शिंदे पूल आणि महापालिकेसमोरील टिळक पुलाच्या दोन्ही बाजूंनी मोठ्या प्रमाणात चारचाकी वाहने पार्क केली जातात. यातील ही वाहने दिवसभर तेथे पार्क केलेली असतात. काही वाहने तर अनेक महिन्यांपासून पुलावर धुळखात उभी आहेत. मात्र, याकडे अंतर्गत रस्त्यांवर पावत्या फाडत फिरणार्‍या वाहतूक पोलिसांचे लक्ष नाही.

शहरातील रस्त्यांवर व पुलांवर पार्क केल्या जाणार्‍या वाहनांमुळे वाहतूक कोंडी होत असल्याच्या तक्रारी येतात. अशावेळी वाहतूक पोलिसांनी कारवाई केल्यानंतर प्रश्न सुटू शकतो. यापूर्वी वाहतूक पोलिसांना याबाबत सांगण्यात आले आहे. आता पुन्हा कल्व्हर्ट व पुलांवर पार्क केलेल्या वाहनांवर कारवाई करण्यासाठी वाहतूक पोलिसांना पत्र देण्यात येईल.

– विकास ढाकणे, अतिरिक्त आयुक्त, महापालिका.

हेही वाचा

Crime News : पत्नीबाबत अपशब्द वापरले म्हणून काढला काटा

Sanjay Raut : संजय राऊत म्हणजे वेडे राजकारणी: खा. कृपाल तुमाने

धुळे : रब्बी हंगामासाठी लाटीपाडा धरणाच्या कालव्याची स्वच्छता

Back to top button