

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्य सरकार आणि शिंदे समितीच्या आदेशानुसार मराठा-कुणबी, कुणबी-मराठा नोंदी शोधण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. त्यानुसार आतापर्यंत शहरासह जिल्ह्यातील तब्बल 23 लाख पाच हजार 57 कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक लाख 34 हजार 744 कुणबी नोंदी सापडल्या आहेत. कुणबी प्रमाणपत्रासाठी निवृत्त न्यायाधीश संदीप शिंदे समितीच्या अहवालानुसार 1968 पूर्वीच्या नोंदी ग्राह्य धरल्या जात आहेत.
त्यानुसार मराठा कुणबी, कुणबी मराठा नोंदी शोधण्याचे काम शासकीय पातळीवर सुरू आहे. याबाबत न्या. शिंदे समितीने दिलेल्या 13 कागदपत्रांच्या आधारानुसार प्रमाणपत्र देण्याच्या प्रक्रियेत आवश्यक आणि अनिवार्य निजामकालीन पुरावे, वंशावळी, शैक्षणिक पुरावे, महसूल पुरावे, निजामकाळात झालेले करार, निजामकालीन संस्थानिकांनी दिलेल्या सनदी, राष्ट्रीय दस्तावेज इत्यादी पुराव्यांची वैधानिक, प्रशासकीय तपासणी करण्यात येत आहे. दरम्यान, पुण्यात कुणबी नोंदी तपासण्यासाठी मोडी अभ्यासकांचीदेखील मदत घेण्यात येत आहे. पुणे पुराभिलेख सहायक संचालकांनी जिल्हाधिकारी कार्यालयात पत्र पाठवून मोडी लिपीचे शिक्षण घेऊन उत्तीर्ण झालेल्या 70 भाषा जाणकारांची यादी जिल्हा प्रशासनाला दिली आहे. पुणे जिल्ह्यात सापडलेल्या कुणबी नोंदी संकेतस्थळावर अपलोड करण्यात येत आहेत. ज्या नागरिकांना कुणबी प्रमाणपत्र घ्यायचे आहे, त्यांनी संकेतस्थळावर जाऊन या नोंदी पाहाव्यात. या नोंदी पाहून त्यामध्ये साधर्म्य असल्यास त्याचा उपयोग प्रमाणपत्र मिळण्यासाठी करून घेता येणार आहे, असेही जिल्हा प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले.\
66 पुणे जिल्ह्यात आतापर्यंत २३ लाख पाच हजार ५७ कागदपत्रांची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये एक लाख ३४ हजार ७४४ कुणबी नोंदी सापडल्या आहेत. अजूनही काम सुरू असून, पुढील आठवड्यापर्यंत काम पूर्ण होण्याची शक्यता आहे.
– ज्योती कदम, निवासी – उपजिल्हाधिकारी, पुणे.
हेही वाचा