कुकडी प्रकल्पात 68 टक्के पाणीसाठा

कुकडी प्रकल्पात 68 टक्के पाणीसाठा

लेण्याद्री(पुणे); पुढारी वृत्तसेवा : कुकडी प्रकल्पात शनिवार (दि. 12) अखेर 20.18 टीएमसी (68.02 टक्के) पाणीसाठा झाला आहे. हा साठा गतवर्षीपेक्षा जवळपास 3.5 टीएमसीने कमी आहे. पावसाने ओढ दिल्याने यंदा धरणे पूर्ण क्षमतेने भरतील का, याबाबत शंका उपस्थित केली जात आहे. गतवर्षी आजअखेर प्रकल्पात 23.49 टीएमसी (79.16 टक्के) पाणीसाठा होता. कुकडी प्रकल्पात जुन्नर तालुक्यातील माणिकडोह, पिंपळगाव जोगा, वडज आणि येडगाव ही चार धरणांसह आंबेगाव तालुक्यातील डिंभे धरणाचा समावेश होतो. या प्रकल्पातून जुन्नर, आंबेगाव, शिरूर तसेच नगर जिल्ह्यातील श्रीगोंदा, पारनेर, कर्जत आणि सोलापूर जिल्ह्यांतील करमाळा तालुक्याला पाणी उपलब्ध होते.

दरम्यान, येडगाव धरणातून 1400 क्युसेकने, तर डिंभे डाव्या कालव्यातून 350 क्युसेकने विसर्ग सुरू आहे. जुन्नर शहर, गोळेगाव, कुमशेत, शिरोली तसेच परिसरातील गावांना पाणी पुरवणार्‍या माणिकडोह धरणात केवळ 53.31 टक्के पाणीसाठा आहे. येत्या काळात पावसाने हुलकावणी दिल्यास पाणीटंचाईची शक्यता आहे. गेल्या वर्षी याच दिवशी माणिकडोह धरणात सुमारे 85 टक्के पाणीसाठा झाला होता.

हेही वाचा

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news