पुणेकरांनी या दिवाळीत केली 25 हजार नव्या वाहनांची खरेदी | पुढारी

पुणेकरांनी या दिवाळीत केली 25 हजार नव्या वाहनांची खरेदी

पुणे : पुढारी वृत्तसेवा :  साडेतीन मुहूर्तांपैकी एक असलेल्या दिवाळी पाडव्याचा मुहूर्त साधत, पुणेकरांनी यंदा 25 हजार 450 वाहनांची खरेदी केली आहे. यात 16 हजार 768 दुचाकी, तर 5 हजार 997 चारचाकींचा  समावेश आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथे दि. 24 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर 2023 या कालावधीत ही वाहन खरेदीची नोंद करण्यात आली आहे. तर गेल्या वर्षी दि. 5 ते 26 ऑक्टोबर 2022 या कालावधीत 22 हजार 181 वाहनांची खरेदी झाली होती. यावरून यंदा गेल्यावर्षीपेक्षा अधिक वाहनांची खरेदी पुण्यात झाली असल्याचे समोर आले आहे. दरम्यान, या वाहनांची नोंद पुणे आरटीओत करण्यात आली आहे.
शोरूम बाहेर गर्दी
पुणेकरांनी दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर यंदा जोरदार खरेदी करण्याचा आनंद घेतला. नवीन वाहनांसोबतच इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, नवीन मालमत्ता खरेदी करून त्यांची मनोभावे पूजा करताना पुणेकर नागरिक पाहायला मिळाले. पाडव्याच्या पूर्वसंध्येला आणि पाडव्याच्या दिवशी शहरातील शोरूममध्ये अनेक पुणेकर नागरिक वाहनाची मनोभावे पूजा करून बुक केलेली वाहने मुहूर्तावर घरी घेऊन जाताना दिसले.  दिवाळी पाडव्याच्या मुहूर्तावर पुणेकर नागरिक नवनवीन वस्तूंची खरेदी करतात. याच मुहूर्तावर पुणेकरांनी गेल्या 22 दिवसांपासून ही वाहन खरेदी केली. ही सर्व वाहने पुणेकरांना मुहूर्तावर आपापल्या घरी घेऊन जाता यावीत, यासाठी वाहनांची नोंदणी प्रक्रिया वेळेत पूर्ण व्हावी, याकरिता प्रादेशिक परिवहन कार्यालय, पुणे येथील कर्मचारी आणि अधिकारीवर्गाकडून मेहनत
घेण्यात आली.
 यंदा पाडव्याच्या मुहूर्तावर झालेली वाहन खरेदी 
अ. क्र. वाहनप्रकार खरेदी वाहन संख्या
1) मोटारसायकल 16,768
2) कार (चारचाकी) 5,997
3) रिक्षा 1076
4) गुडस 920
5) टॅक्सी 607
6) बस 82
एकूण वाहने 25 हजार 450
हेही वाचा :

Back to top button