

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळीत लक्ष्मीपूजनाच्या दिवशी रविवारी शहराच्या हवेची गुणवत्ता अतिखराब श्रेणीत गेली होती. मात्र, गुरुवारी हे प्रदूषण बहुतांश भागातून निम्म्याने कमी झाले होते. स्वारगेट, शिवाजीनगर, लोहगाव येथील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत मोजली गेली.
यंदाच्या दिवाळीत शहराच्या हवेची गुणवत्ता दिल्लीनंतर सर्वांत प्रदूषित गटात गणली गेली. गेल्या पाच वर्षांत पुणे शहरात दिवाळीत फोडलेल्या फटाक्यांमुळे होणारे वायुप्रदूषण हे दिल्लीनंतर सर्वाधिक मोजले गेले होते. यंदा सलग सहाव्या वर्षी शहराने हा क्रमांक कायम ठेवला. पुणेकरांनी रविवारी 12 नोव्हेंबर रोजी लक्ष्मीपूजनाच्या दिवशी फटाक्यांची प्रचंड आतषबाजी केली होती. रविवारी हवेची गुणवत्ता खराब, तर सोमवारी ही गुणवत्ता अतिखराब श्रेणीत गेली होती. त्यानंतर मात्र शहरात फटाक्यांची आतषबाजी कमी झाल्याने गुरुवारी शहराच्या बहुतांश भागातील प्रदूषण कमी झाले होते. स्वारगेट, शिवाजीनगर आणि लोहगाव या भागांतील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत असल्याची नोंद सफर संस्थेने घेतलेल्या निरीक्षणात आढळून आली.
गुरुवारच्या हवेची गुणवत्ता, पुणे शहर (मायक्रो ग्रॅम प्रतिक्युबिक मीटर)
स्वारगेट – 241 – खराब
शिवाजीनगर – 219 – खराब
लोहगाव – 203 – खराब
विद्यापीठ रस्ता – 132- मध्यम
कर्वे रस्ता – 123 – मध्यम
कात्रज रस्ता – 110 – मध्यम