शिष्यवृत्तीधारकांना दिवाळी भेट ; योजना संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना 19 कोटींचे वितरण | पुढारी

शिष्यवृत्तीधारकांना दिवाळी भेट ; योजना संचालनालयाकडून विद्यार्थ्यांना 19 कोटींचे वितरण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : शालेय शिक्षण विभागाच्या पाचवी-आठवी शिष्यवृत्ती परीक्षेतील 32 हजार 667 शिष्यवृत्तीधारकांना योजना संचालनालयामार्फत नवीन दराने 19 कोटी रुपयांचे वितरण दीपावलीच्या पार्श्वभूमीवर करण्यात आल्याची माहिती योजना शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिली आहे. महाराष्ट्रात सन 1954-55 पासून सदर योजना कार्यान्वित आहे. आता ही शिष्यवृत्ती परीक्षा पाचवी-आठवीसाठी घेतली जाते. महाराष्ट्र राज्य परिक्षा परिषदेमार्फत घेण्यात येणा-या या शिष्यवृत्तीमधील गुणवत्ता यादीतील विद्यार्थ्याना मंजूर संचाच्या अधीन राहून योजनेचा लाभ दिला जातो. योजना शिक्षण संचालनालयाचे उपसंचालक राजेश क्षीरसागर म्हणाले की, ही शिष्यवृत्ती गुणवान विद्यार्थ्यांना शैक्षणिक प्रोत्साहनात्मक देण्यात येते. पाचवीसाठी एकूण संच संख्या 16 हजार 683 तर आठवीसाठी 16 हजार 258 संच संख्या आहे.

संबंधित बातम्या :

दरवर्षी पाचवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि पुढे सहावी ते आठवीमध्ये शिक्षण घेणार्‍या एकूण 50 हजार 49 विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती देण्यात येते. तर आठवीच्या परीक्षेतून शिष्यवृत्तीधारक ठरलेल्या आणि नववी-दहावीमध्ये शिक्षण घेणार्‍या 32 हजार 516 विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती देण्यात येते.

सन 2022-23 पर्यंत विद्यार्थ्यांना संचनिहाय जुन्या दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत होते. चालू वर्षापासून सन 2023 पासून पाचवीला 5 हजार तर आठवीला साडेसात हजार अशी शिष्यवृत्तीच्या दरामध्ये सुधारणा करण्यात आली आहे. त्याप्रमाणे विद्यार्थ्यांना सन 2023-24 पासून वाढीव दराने शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येत आहे. सध्या संबंधित शिष्यवृत्तीसाठी चाळीस कोटी चाळीस लाख रुपये मंजूर आहे.

2023-24 मध्ये विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती वितरणासाठी एकोणपन्नास कोटी चौर्‍याण्णव लाख पन्नास हजार रुपये आवश्यक आहेत. त्यापैकी नुकताच शासनस्तरावरून एकोणीस कोटी एकोणचाळीस लाख एकोणीस हजार रुपये निधी प्राप्त झाला आहे. हा निधी सध्या सातवी, आठवी, दहावीमध्ये शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना देण्यात आला आहे.

18 फेब्रुवारीला होणार परीक्षा
2023-24 करिता 18 फेब्रुवारी रोजी राज्यात शिष्यवृत्ती परीक्षा घेण्यात येणार आहे. त्यासाठी परीक्षा परिषदेच्या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू असून, 9 नोव्हेंबरपर्यंत राज्यातील 34 हजार 432 शाळांमधील पाचवीच्या 3 लाख 77 हजार 806 आणि आठवीच्या 2 लाख 82 हजार 457 विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरले आहेत. नियमित शुल्कासह ऑनलाइन अर्ज भरण्याचा अखेरचा 30 नोव्हेंबर, तर विलंब शुल्कासह 15 डिसेंबर आहे.

उर्वरित विद्यार्थ्यांना नवीन दराने शिष्यवृत्ती वितरित करण्यासाठी आवश्यक निधीची राज्य शासनाकडे मागणी केली आहे. निधी प्राप्त होताच उर्वरित सर्व विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्तीचे वितरण करण्यात येईल.
                                         डॉ. महेश पालकर, शिक्षण संचालक (योजना) पुणे

Back to top button