शालेय विद्यार्थ्यांची आता ऑनलाईन हजेरी; 1 डिसेंबरपासून हाेणार अंमलबजावणी

शालेय विद्यार्थ्यांची आता ऑनलाईन हजेरी; 1 डिसेंबरपासून हाेणार अंमलबजावणी
Published on
Updated on

सातारा; पुढारी वृत्तसेवा : स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अशंत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची हजेरी ऑनलाईन घेण्याचा निर्णय शिक्षण विभागाने घेतला आहे. दि. 1 डिसेंबरपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे. स्विप्ट चॅट या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. ऑनलाईन हजेरीमुळे विद्यार्थ्यांच्या उपस्थितीतील बोगसगिरीला आळा बसणार आहे.

शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे. विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्यासाठी अटेन्डन्स बॅाटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्र स्तरावरील शिक्षकांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी या विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले आहेत.

पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी स्विफ्ट चॅट अ‍ॅप डाऊनलोड करून त्या अ‍ॅपवरील टेन्डन्स बॉटद्वारे ऑनलाईन नोंदवणे आवश्यक आहे. सद्य:स्थितीत जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेन्डन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदवता येईल. उपस्थिती नोंदवताना शिक्षकांनी शाळेचा युडायस क्रमांक आणि स्वत:च्या शालार्थ क्रमांकाचा वापर करावा. शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक वापरावा. मोबाइल क्रमांक बदलला असल्यास तो शालार्थ संकेतस्थळावर अद्ययावत करणे गरजेचे आहे. सेवार्थ आणि इतर प्रणालीतील शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाईन नोंदवण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रात भरणार्‍या शाळांसाठी सकाळी 7 ते दुपारी 12 तर शाळांसाठी सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद करावी, अशा सूचना देण्यात आल्या आहेत.

संकेतस्थळावरील माहिती करावी लागणार अद्यावत

चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदवताना शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाईन उपस्थिती नोंदवावी. विद्यार्थी उपस्थिती नोंदवताना अडचणी येत असल्यास शालार्थ संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, युडायस या सर्व संकेतस्थळावरील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळावरील अडचणी दूर झाल्यावर अडचणी दूर होतील असे स्पष्ट करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news