पुणे : पुढारी वृत्तसेवा : सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांना सेवेच्या निर्धारित कृती मानकांप्रमाणे सेवा देण्यासाठी महावितरण अतिशय गंभीर आहे. त्यानुसार सुरळीत वीजपुरवठा, नवीन वीजजोडणी, अचूक बिलिंग व तक्रारींचे निराकरण, यामधील तत्परतेत हयगय खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा महावितरणचे संचालक (संचालन), संजय ताकसांडे यांनी गुरुवारी आढावा बैठकीत दिला. पुणे परिमंडलांतर्गत ग्राहकसेवांसह विविध मुद्द्यांवरील कामकाजाबाबत सर्व मंडल, विभाग व उपविभाग कार्यालयांचा प्रकाशभवन येथे आढावा घेताना संचालक ताकसांडे बोलत होते. या वेळी पुणे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार (पुणे परिमंडल), संजय पाटील (देयके व महसूल) उपस्थित होते.
ताकसांडे म्हणाले की, वीजग्राहकांना मइज ऑफ लिव्हिंगफप्रमाणे सेवा देण्यास महावितरणने अतिशय गंभीरपणे प्रारंभ केला आहे. यामध्ये कर्मचार्यांची तत्परता अतिशय महत्त्वाची आहे. प्रत्येक कर्मचार्याने याची नोंद घ्यावी व त्याप्रमाणे ग्राहकांना सेवा देण्यात कोणतीही कुचराई करू नये. चालू वीजबिलांसह थकबाकीची 100 टक्के वसुली करण्याचे निर्देश त्यांनी दिले. अचूक बिलिंगसाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वीजग्राहकांच्या तक्रारींचे प्रमाण लक्षणीय कमी झाले आहे. परंतु, प्रत्यक्षात वीजवापर मोठ्या प्रमाणात होत असताना अचूक रीडिंगअभावी किंवा सरासरी वीजबिलांद्वारे चुकीचे बिल देण्याचा प्रकार खपवून घेतला जाणार नाही. यासह बिलिंगबाबत ग्राहकांच्या तक्रारींचे विनाविलंब निराकरण करावे, असेही संचालक (संचालन) ताकसांडे यांनी स्पष्ट केले.
कृषिपंपाच्या नवीन वीजजोडण्यांसाठी आवश्यक निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे. कोटेशनची रक्कम भरलेल्या पुणे परिमंडलातील प्रलंबित कृषी वीजजोडण्या येत्या नोव्हेंबरअखेरपर्यंत कार्यान्वित कराव्यात. रब्बी हंगाम सुरू होत असल्याने कृषिपंपांना वीजपुरवठा करणारे नादुरुस्त तसेच जळालेले रोहित्र तातडीने बदलण्यासाठी अतिरिक्त रोहित्र तयार ठेवावेत, असे ताकसांडे यांनी स्पष्ट केले. या बैठकीला अधीक्षक अभियंता अरविंद बुलबुले, युवराज जरग अभियंता व वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
हेही वाचा :