Pune News : पती-पत्नीच्या नात्याला नव्याने प्रेमाचा बहर

Pune News : पती-पत्नीच्या नात्याला नव्याने प्रेमाचा बहर
Published on
Updated on

पुणे : सोशल मीडियाचा अतिवापर, बदलती विचारसरणी, परस्पर विरोधी जीवनशैली, आर्थिक असमानता, वैचारिक मतभेदांसह किरकोळ कारणांमुळे विभक्त राहणारे दाम्पत्य समुपदेशनानंतर पुन्हा एकत्र येत असल्याचे आश्वासक चित्र कौटुंबिक न्यायालयातील प्रकरणांवरून दिसत आहे. शिवाजीनगर येथील कौटुंबिक न्यायालयात वर्षभरात पुन्हा नांदायला येण्यासाठीचे तब्बल 832 दावे दाखल झाले. त्यांपैकी 765 निकाली निघाले असून, पाचशेहून अधिक पती-पत्नी पुन्हा एकत्र आले आहेत.

संसार म्हटला की भांड्याला भांड लागतंच!. क्षुल्लक गोष्टींवरून रागाचा पारा चढेल हे सांगता येत नाही. अहंकारामुळे कोणीच झुकते घ्यायला तयार नसते. मग, वाद इतके विकोपाला जातात की पती व पत्नी एकमेकांपासून वेगळे राहू लागतात. नात्यात कटुता आल्यानंतर पुन्हा एकत्र येण्यासाठी सहज तयार होत नाहीत. त्यामुळे ही लग्नाची गोष्ट घटस्फोट घेण्याच्या निर्णयापर्यंत जाते. त्यासाठी न्यायालयाची पायरी चढली जाते. त्यापैकी काहीजण विभक्त होण्याच्या उंबरठ्यावर पोहोचतात. मात्र, समुपदेशादरम्यान खूप गोष्टींचा उलगडा होते. आपापल्या चुका लक्षात येतात. त्यानंतर समोपचाराने मिटवून बहुतांश दाम्पत्यांचा संसार पुन्हा नव्याने सुरू होत असल्याचे फॅमिली कोर्ट लॉयर्स असोसिएशनच्या अध्यक्षा अ‍ॅड. वैशाली चांदणे यांनी सांगितले.

कौटुंबिक न्यायालयातील वर्षभरातील प्रकरणे

  • नांदण्यास येण्यासाठी दाखल अर्ज… 832
  • निकाली काढण्यात आलेली प्रकरणे…765
  • घटस्फोटासाठी दाखल असलेले अर्ज….694
  • परस्पर संमतीने विभक्त झालेली प्रकरणे…625

का येतात एकत्र?

  • मुलांच्या भवितव्याचा विचार
  • स्वत:ची चूक लक्षात येते
  • किरकोळ कारण उमजते

समुपदेशनामुळे दोघांमधील गैरसमज दूर होतात आणि मैत्रीपूर्ण वातावरण समुपदेशक निर्माण करण्याचा प्रयत्न करतात, यामुळे एकमेकांच्या चुका उमगतात आणि पुन्हा नव्याने एकत्र येण्यास मदत होते. अनेकदा वाद कमी, मात्र गैरसमज जास्त असतात. ते टोकाला नेलेले असतात. त्यात घरच्यांचा हस्तक्षेप आणि मग माझा मुलगा आणि माझी मुलगी यातून वाद वाढतात. यावर समुपदेशन हा रामबाण उपाय आहे. शिवाय समुपदेशक गरज असेल, तर कुटुंबीयांना बोलावून त्यांचेही समुपदेशन करतात.

– अ‍ॅड. भाग्यश्री गुजर-मुळे,
माजी खजिनदार, पुणे बार असोसिएशन.

पती-पत्नीमधील वाद बहुतांशवेळा क्षुल्लक कारणावरून चालू होतात. कालांतराने नमतेपणा कोणी घ्यायचा, यावरून वाद विकोपाला जातो. संवादाच्या अभावामुळे दुरावा वाढतो. मग, प्रकरण घटस्फोटापर्यंत पोहोचते. ते समुपदेशकांपर्यंत आल्यानंतर योग्यरीत्या समुपदेशन झाल्यानंतर उभयतांमधील वाद मिटतात अन् दोघेही एकत्र राहू लागतात. उभयतांमधील वादाचे रूपांतर सुसंवादामध्ये करण्याचे मोलाचे काम समुपदेशकांमार्फत केले जाते. त्यामुळे अनेक संसार वाचतात.

– अ‍ॅड. विराज करचे-पाटील,
माजी सदस्य, पुणे बार असोसिएशन.

हेही वाचा

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news