युद्धकारण : कुठून मिळतो ‘हमास’ला पैसा? | पुढारी

युद्धकारण : कुठून मिळतो ‘हमास’ला पैसा?

विश्वास सरदेशमुख

इस्रायलसारख्या संरक्षण क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाने सज्ज असणार्‍या आणि प्रतिबंधात्मक हल्ल्यांबाबत दक्ष असणार्‍या देशावर भीषण हल्ला करून हमास ही संघटना पुन्हा एकदा जागतिक चर्चेच्या केंद्रस्थानी आली. ‘हमास’ला भारताने अद्यापपर्यंत दहशतवादी संघटना म्हटलेले नसले तरी या संघटनेची कृत्ये त्याच श्रेणीत गणली जातात. अलीकडेच उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, या संघटनेची वार्षिक उलाढाल एक अब्ज डॉलर्सहून अधिक आहे.

इस्रायलच्या संरक्षणात्मकद़ृष्ट्या अभेद्य गडाला जबरदस्त तडाखे देऊन बेंजामिन नेतान्याहूंसह मोसाद या जगातील आघाडीच्या गुप्तचर संघटनेला धक्का देणार्‍या हमास या संघटनेची जगभरात चर्चा आहे. अमेरिकेतील इस्रायलच्या दूतावासाने काही दिवसांपूर्वी सोशल मीडियावर जारी केलेल्या एका पोस्टमध्ये हमास या संघटनेच्या श्रीमंतीची पोलखोल करण्यात आली आहे. 65 सेकंदांच्या या व्हिडीओतील माहितीनुसार वार्षिक एक अब्ज डॉलरची उलाढाल करणारी हमास संघटना ही इसिसनंतरची सर्वात धनाढ्य दहशतवादी संघटना आहे. आयसिसची अंदाजित उलाढाल यापेक्षा दोन ते तीन पट अधिक आहे.

या व्हिडीओत म्हटल्यानुसार हमासकडून मिळालेल्या पैशांचा वापर भुयारी मार्ग तयार करण्यासाठी केला जातो. या व्हिडीओत अनेक हमास नेत्यांच्या मालमत्तेचेदेखील आकलन करण्यात आले आहे. पॅलेस्टिनींचे तारणहार म्हणून दावा करणारे हे लोक गाझापासून शेकडो किलोमीटर लांब कतारमध्ये राहतात. हमासच्या पॉलिटिकल ब्युरोचा उपाध्यक्ष अबू मरजोक याची मालमत्ता तीन अब्ज डॉलर आहे; तर वरिष्ठ नेता खालिद मशाल आणि इस्माईल हानियेह यांची मालमत्ता चार अब्ज डॉलर आहे. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार, हमासचा नेता खालिद मशाल याच्या पैशाचा एक भाग गुंतवणुकीत असून त्यात इजिप्तमधील बँक आणि आखाती देशातील रिअल इस्टेट प्रकल्पांचा समावेश आहे. यावरून एक गोष्ट लक्षात येते की, वेगवेगळ्या स्तरावरील हमासचे नेते हे केवळ धनदांडगेच नसून अब्जाधीश-कोट्यधीश आहेत. त्यांच्या उत्पन्नांच्या साधनांत भूमिगत भुयाराच्या जाळ्यातून होत असलेल्या तस्करीवर आकारण्यात येणार्‍या 20 टक्के कराचा समावेश आहे. तसेच आंतरराष्ट्रीय देणगीदारांकडून आणि प्रामुख्याने कतारकडून मिळणारा पैसाही त्यांच्या अर्थकारणाचा महत्त्वाचा भाग आहे.

एका अहवालात म्हटले, व्यक्तिगत मालमत्ता तयार करण्याव्यतिरिक्त हमासच्या संपत्तीचा वापर हा तुरुंगात असलेल्या दहशतवाद्यांच्या कुटुंबीयांचे पालनपोषण करण्यासाठी केला जातो. त्यात तीन वर्षांपर्यंत शिक्षा भोगणार्‍या लोकांसाठी दरमहा चारशे डॉलर ते तीस वर्षे आणि त्यापेक्षा अधिक शिक्षा भोगणार्‍या लोकांच्या कुटुंबीयांसाठी दरमहा 3400 डॉलर हमासकडून दिले जातात. वास्तविक आजघडीला 60 टक्के पॅलेस्टिनी जागतिक दारिद्य्र रेषेखाली राहात असून त्यांचे दरमहा उत्पन्न 60 डॉलरपेक्षा कमी आहे.

दुसरीकडे, हमासचा टॉप कमांडर इस्माईल हनियेह हा गाझा आणि तुर्किएतील अनेक मालमत्तांचा मालक आहे. तो कतारमध्ये राहतो. तेथे त्याचा एक आलिशान व्हिला आहे. तेथील सुरक्षा रक्षकाला 25 हजार डॉलर मासिक वेतन मिळते. त्याचा मुलगा अब्देल सलमा याला इजिप्तच्या अधिकार्‍यांनी 28 ऑक्टोबर 2023 रोजी शस्त्र आणि संपत्ती चोरी प्रकरणी अटक केली आहे.

हमास ही गाझातील व्यापार्‍यांवर भाजीपाल्यापासून आलिशान मोटारींवर, व्यापार करण्यात येणार्‍या प्रत्येक गोष्टींवर कर आकारते. हा पैसा या नेत्यांच्या खिशात जातो. हमासचा वरिष्ठ नेता भुयारातून येणार्‍या प्रत्येक वाहनांवर 25 टक्के कर आकारतो. ही आकारणी सुमारे दोन हजार डॉलर इतकी आहे. इजिप्त ते गाझा यात शेकडो गुप्त भुयारी मार्ग आहेत. जून 2007 ते 2010 या काळात भुयारातील व्यवहारात 800 दशलक्ष डॉलरच्या रोखीचे हस्तांतर झाल्याची माहिती समोर आली होती. हमास नेत्यांसाठी संपत्तीचा आणखी एक स्रोत म्हणजे जमिनींवरचा ताबा. ते प्रामुख्याने समुद्राजवळचा चांगला भाग बळकवतात आणि तो काही काळाने जादा किमतीत विकतात.

हमासकडून आपल्या पायदळासाठी करावयाच्या खर्चाच्या नावानेही भरमसाट वसुली केली जाते. मात्र या यादीत असणार्‍या असंख्य दहशतवाद्यांची आणि अधिकार्‍यांची नावे खोटी आहेत. त्यामुळे यातून मिळणारा फंड हा हमासचे नेते खिशात घालतात. गाझाच्या लोकांसाठी मिळणारी मदत आणि पायाभूत सुविधांसाठी जगभरातील अनेक देशांतून आणि संघटनांकडून निधी येतो. त्यावर हमासचे नियंत्रण असते. हा फंडदेखील म्होरके चोरतात.

2003 मध्ये अमेरिकेच्या कोषागार कार्यालयाने हमासला पाठिंबा देणार्‍या ब्रिटन, स्वित्झर्लंड, ऑस्ट्रिया, लेबनॉन आणि फ्रान्समधील पाच वेगवेगळ्या चॅरिटी संघटनांना दहशतवादी संघटनेत सामील केले. 2009 मध्ये न्याय विभागाने हमासला अर्थसहाय्य करणार्‍या अमेरिकेतील लँड फाऊंडेशन फॉर रिलीफ अँड डेव्हलपमेंटच्या नेत्यांना दोषी ठरवले होते.

आखातातील राजकारणाचे अभ्यासक डॉ. मोशे एलाद यांच्या मते, हमासचे बहुतांश संस्थापक हे निर्वासित किवा निर्वासितांचे वारसदार आहेत. त्यापैकी काहीजण इजिप्त आणि गाझाचे रहिवासी यांच्या विवाहातून जन्मले आहेत. सुरुवातीच्या काळात त्यांच्याकडे अजिबातच पैसा नव्हता. हमास अस्तित्वात नसतानाही या मंडळींनी इस्रायलला त्रस्त केले. ‘अल फतह’ला संतुलित करताना गाझातील इस्लामी संघटनांना अर्थसहाय्य करण्यात आले. यावेळी इस्रायलशी संबंध तोडण्याबरोबरच अन्य ठिकाणांवरून निधीचा शोध घेण्याचा निर्णय घेतला गेला. यातून या नेत्यांच्या मालमत्तेत वाढ होत गेली. हा पैसा चहूबाजूंनी आला होता. मृत्युमुखी पडणार्‍या कुटुंबांकडून दिले गेलेले दान, ज्याला अरबी भाषेत ‘जकाला’ म्हणतात आणि विविध देशांकडून आलेला पैसा हे त्यावेळी प्रमुख स्रोत ठरले होते. याचा प्रारंभ सीरिया, सौदी अरेबिया आणि त्यानंतर मुख्य प्रायोजक असणार्‍या इराणकडून झाला आणि त्याचा शेवट कतारपाशी येऊन थांबला. अर्थात आता पुन्हा ही जागा इराणने घेतली आहे.

हमासकडून पैसा गोळा करण्यासाठी चक्क अमेरिकेतही अभियान राबविले गेले. एलाद म्हणतात, मौसा अबू मरझोकने अमेरिकेतील श्रीमंत मुस्लिमांकडून पैसे गोळा करण्यास सुरुवात केली आणि त्यासाठी अनेक बँका स्थापन केल्या. काळानुसार त्याने अर्थसहाय्य करणार्‍या दहा संस्थांचा गट तयार केला आणि त्या माध्यमातून कर्जेही दिली. या संस्थांमध्ये गुंतवणूकही होऊ लागली. परिणामी तो एक मोठा अर्थदाता बनला. 1995 मध्ये अमरिकेने अबू मरजोकला दहशतवादी कारवायांना पाठबळ केल्याप्रकरणी अटक केली आणि दोन वर्षे तुरुंगात राहिल्यानंतर त्याला कोणत्याही खटल्यशिवाय हद्दपार केले. मात्र त्याचे पैसे जप्त केले. एलाद म्हणतात, 1997 मध्ये जेव्हा त्याची हकालपट्टी करण्यात आली, तेव्हा त्याची मालमत्ता काही लाखात होती.

कसाबसा तो काही खटल्यांपासून वाचण्यात यशस्वी ठरला. काहीजण म्हणतात, त्याने अमेरिकी प्रशासनाशी संपर्क ठेवला होता. मात्र ही बाब सिद्ध झाली नाही. एवढ्या गंभीर आरोपातून तो सहीसलामत कसा सुटला, यामागचे कारण गुलदस्त्यातच राहिले. 9/11 च्या हल्ल्याच्या चौकशीदरम्यान तो अल-कायदाशी संबंधित असल्याचे आढळून आले. हल्ला घडवून आणणार्‍या अल-कायदाच्या 21 दहतवाद्यांसाठी केलेल्या निधी हस्तांतरात तो सामील हाता. आज अबू मरजोक हा हमासच्या प्रमुख अब्जाधीशांपैकी एक आहे. एका अंदाजानुसार त्याची मालमत्ता 2 ते 3 अब्ज डॉलर आहे. वरिष्ठ अधिकारी ते म्होरक्या झालेला खालिद मशाल देखील अब्जाधीश आहे. त्याची मालमत्ता 2.6 अब्ज डॉलर असल्याचे सांगितले जाते. मात्र अन्य काहीजण त्याची मालमत्ता 5 अब्ज डॉलर असल्याचे सांगतात. त्याने इजिप्तच्या बँकांत आणि आखाती देशात गुंतवणूक केली आहे. रिअल इस्टेटमध्ये देखील त्याचा पैसा आहे. हमासचे नेते दळणवळणाच्या साधनांवर आणि इंधनाच्या साठ्यांवर ताबा मिळवतात. काहीजण भ्रष्ट मार्गानेही पैसा जमवतात. यातून ते वैयक्तिकद़ृष्ट्या ऐषोआरामाचे आयुष्य जगतात; पण यामध्ये सामान्य पॅलेस्टिनी नागरिक मात्र पूर्णतः बेचिराख झाला आहे.

दहशतवादी संघटना असोत किंवा मूलतत्त्ववादी विचारसरणीचा प्रसार करणारे असोत, त्यांचे अनुयायी, फॉलोअर्स, समर्थक हे जगण्याचा संघर्ष करत जगत असतात; मात्र समाजात विषपेरणी करणारे आणि विघातक कृत्ये करणारे मास्टरमाईंड सुखेनैव आयुष्य जगत असतात. जगभरात सर्वत्र हा प्रकार पाहायला मिळतो. दुर्दैवाची बाब म्हणजे, हे मास्टरमाईंड फार कमी वेळा पकडले वा मारले जातात! त्यामुळे त्यांची कुणाशी मिलीभगत असते का, असाही प्रश्न उपस्थित केला जातो; पण याचे उत्तर कधी मिळत नाही!

Back to top button