Pune : वाल्हे ग्रा.पं.ची पाइपलाइन फुटली ; हजारो लिटर पाणी वाया | पुढारी

Pune : वाल्हे ग्रा.पं.ची पाइपलाइन फुटली ; हजारो लिटर पाणी वाया

वाल्हे : पुढारी वृत्तसेवा :  वाल्हे (ता. पुरंदर) ग्रामपंचायतीची पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन मागील महिन्यापासून फुटली आहे. मात्र, अद्यापि ग्रामपंचायतीच्या प्रशासकांचे पाइपलाइनच्या दुरुस्तीकडे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे.
गेल्या महिन्यात ग्रामपंचायत कार्यालयाकडे जाणार्‍या मुख्य रस्त्यावरील पाइपलाइन फुटून पाण्याची गळती लागली आहे. त्यामुळे रस्त्यावर दररोज लाखो लिटर पाणी वाहत आहे. तर काही ठिकाणी डबकी व चिखल साचला आहे. त्याचा ग्रामस्थांसह वाहनचालकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. जून 2023 पासून ग्रामपंचायतीचा कारभार प्रशासकाकडे आहे.

मात्र, प्रशासकांचे याकडे दुर्लक्ष असल्याचा आरोप ग्रामस्थांकडून केला जात आहे. नुकतीच ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध पार पडली असून, अद्यापपर्यंत सरपंच, उपसरपंचांनी कारभार हाती घेतलेला नाही. त्यामुळे ग्रामस्थांना अडचणींना सामोरे जावे लागत आहे. गावात पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. माळवाडी, एसटी बसस्थानक परिसरात पिण्याचे पाणीच येत नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर पाण्यासाठी महिलांना वणवण करावी लागत आहे. त्यामुळे संतापलेल्या महिलांनी दिवाळीच्या पहिल्याच दिवशी आक्रमक पवित्रा घेत गुरुवारी (दि. 9) ग्रामपंचायत कार्यालयावर हंडा मोर्चा काढला. यंदा पुरंदर तालुक्यात पावसाचे प्रमाण अत्यल्प आहे. सर्वत्र दुष्काळसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. अनेक वाड्या-वस्त्यांवर टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे, तर दुसरीकडे वाल्हे ग्रामपंचायत प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे हजारो लिटर पाणी वाया जात आहे.

हेही वाचा :

Back to top button