मंचर : पुढारी वृत्तसेवा : जळगाव (जि. बीड) येथील बंद पडलेल्या कडा सहकारी साखर कारखान्यातून चोरी केलेले किर्लोस्कर कंपनीचे इंजिन विक्रीसाठी घेऊन जाणार्या दोघांवर मंचर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. यापैकी एक जण अंधाराचा फायदा घेत पळून गेला, तर दुसर्यास ताब्यात घेण्यात आले. या कारवाईत पोलिसांनी इंजिन, वाहन असा एकूण 4 लाख 45 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. मंचर (ता. आंबेगाव) येथे ही कारवाई करण्यात आली.
रवींद्र माणिक पोमण (वय 24) व वैभव पांडुरंग कुलवडे (दोघेही रा. जळगाव, ता. आष्टी, जि. बीड) अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी पोलिस शिपाई संदीप रावते यांनी मंचर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. मंचर ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक बालाजी कांबळे, पोलिस हवालदार नंदकुमार आढारी, पोलिस शिपाई संदीप रावते, कुलवडे हे तांबडेमळा हद्दीत गस्त घालत होते. या वेळी येथील हॉटेल धनगरवाडा येथे पुणे-नाशिक महामार्गालगत दोन जण छोट्या टेम्पोतून (एम एच 23 ए यु 3312) साहित्य घेऊन जाताना दिसले. त्यांना पोलिसांनी थांबण्याचा इशारा केला. मात्र, टेम्पो वेगाने पुढे गेला. त्यावर पोलिसांनी पाठलाग करून टेम्पोला अडवले. या वेळी टेम्पोतील वैभव कुलवडे हा पळून गेला, तर रवींद्र पोमण याला ताब्यात घेण्यात आले.
हेही वाचा :