Pimpri News : विनापरवाना कारखान्यावर कारवाईचा आदेश | पुढारी

Pimpri News : विनापरवाना कारखान्यावर कारवाईचा आदेश

देहूगाव : पुढारी वृत्तसेवा : देहूतील विनापरवाना कारखान्याची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश देहू नगरपंचायतीच्या मुख्याधिकार्‍यांनी पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांनी दिले आहेत. देहूगाव वडाचा माळ या ठिकाणी असलेल्या संत तुकाराम सोसायटीलगतच बेकायदेशीर असणारा फॅब्रिकेशनचा कारखाना सुरू करण्यात आला आहे. यामुळे भागात मोठ्या प्रमाणात वायू, ध्वनिप्रदूषण होत आहे.

लोखंडी प्लेटवर प्रक्रिया करण्यासाठी पेंट आणि इतर केमिकलचा वापर करीत असल्याने त्या केमिकलची सुटणारी दुर्गंधी आणि होणार्‍या ध्वनी व वायुप्रदूषणामुळे संत तुकाराम सोसायटीत राहणार्‍या सहाशे ते सातशे नागरिक तसेच मुलांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. तसेच ध्वनी व वायू प्रदूषणामुळे नागरिकांना श्वसनाचा त्रास होत असल्याची लेखी तक्रार संत तुकाराम सोसायटीमधील नागरिकांनी प्रदूषण नियंत्रण मंडळ, देहूनगर पंचायत तसेच पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालय आणि पुणे जिल्हाधिकार्‍यांकडे करून हा कारखाना बंद करण्यात यावा, अशी मागणी केली होती.

संत तुकाराम सोसायटीतील त्रस्त नागरिक

या कारखान्याचा त्रास इतका होत आहे, की या सोसायटीत राहणे मुश्कील झाले आहे. त्यापेक्षा आमची सोसायटी आहे, तशी कोणीही विकत घ्यावी, आम्ही पुन्हा राहण्यास जातो पिंपरी चिंचवड भागात. एक तर संत तुकाराम महाराजांची भूमी, शांत आणि प्रसन्न भाग, देवाच्या दारात राहावे यासाठी आम्ही इथे राहण्यास आलो. पण हा त्रास सहन करावा लागेल असे आम्हाला वाटले नाही. पण या संत तुकोबांच्या भूमीत आमचे जगणे मुश्कील झाले आहे. त्यापेक्षा कंपनी मालक किंवा कोणीही आमची सोसायटी विकत घ्यावी. आम्ही देहूगाव सोडून जातो.

स्थानिकांचे काय?

आमचा उदरनिर्वाह करण्यासाठी आम्ही व्यवसाय करू नये का? देहूगावामध्ये आमच्या मालकीच्या जमिनी आहेत, एक तर आम्हाला नोकर्‍या नाहीत. कुटुंब आहे, मुलाबाळांचे शिक्षण आहे. त्यासाठी जमिनी विकण्यापेक्षा भाड्याने दिल्या. आता त्यात कोणी त्यांचा व्यवसाय करीत असतील आणि त्यापासून आमच्या उदरनिर्वाह होत असेल तर त्यात आमची चूक काय आहे ? आमच्या उदरनिर्वाहाचे साधन म्हणून आमच्या सारख्या स्थानिक नागरिकांनी करायचं काय?

अर्जाची दखल

त्या अर्जाची दखल घेऊन या कारखान्याची चौकशी करून त्वरित कारवाई करण्याचे आदेश देहूनगर पंचायतीचे मुख्याधिकारी यांनी पुणे येथील प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकार्‍यांना दिले आहेत. आता देहूनगर पंचायत काय कारवाई करणार, याकडे संत तुकाराम सोसायटीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे.

हेही वाचा

Back to top button