Pune News : विद्यार्थ्यांची 1 डिसेंबरपासून ऑनलाइन हजेरी | पुढारी

Pune News : विद्यार्थ्यांची 1 डिसेंबरपासून ऑनलाइन हजेरी

पुणे : पुढारी वृत्तसेवा : राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्था, खासगी अनुदानित आणि अंशत: अनुदानित शाळांतील पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती आता 1 डिसेंबरपासून ऑनलाइन नोंदणी केली जाणार आहे. स्विफ्ट चॅट या उपयोजनाद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार आहे. राज्यातील शिक्षण क्षेत्रातील माहिती संकलन आणि विश्लेषण प्रक्रिया अधिक वेगवान, सुलभ होण्यासाठी महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेतर्फे पुण्यात विद्या समीक्षा केंद्र कार्यान्वित करण्यात आले आहे.

विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्यासाठी अटेंडन्स बॉटच्या वापराचे प्रशिक्षण विभाग, तालुका, केंद्रस्तरावरील शिक्षकांना देण्यात आले आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्राथमिक शिक्षण परिषदेचे राज्य प्रकल्प संचालक प्रदीपकुमार डांगे यांनी विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याबाबतचे निर्देश परिपत्रकाद्वारे दिले. पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांची उपस्थिती वर्गशिक्षकांनी स्विफ्ट चॅट अ‍ॅप डाऊनलोड करून त्यामधील अटेंडन्स बॉटद्वारे ऑनलाइन नोंदविणे आवश्यक आहे.

जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिका, अनुदानित शाळेतील शालार्थ क्रमांक उपलब्ध शिक्षकांना अटेंडन्स बॉटद्वारे उपस्थिती नोंदविता येईल. उपस्थिती नोंदविताना शिक्षकांनी शाळेचा यू-डायस क्रमांक आणि स्वत:च्या शालार्थ क्रमांकाचा वापर करावा. शालार्थ क्रमांकासाठी वापरलेलाच मोबाईल क्रमांक वापरावा. शिक्षकांना विद्यार्थ्यांची उपस्थिती ऑनलाइन नोंदविण्याबाबत स्वतंत्रपणे सूचना दिल्या जातील. दोन सत्रांत भरणार्‍या शाळांसाठी सकाळी सात ते दुपारी बारा, तर शाळांसाठी दहा ते पाच या वेळेत विद्यार्थी उपस्थितीची नोंद अटेंडन्स बॉटवर करावी, अशा सूचना दिल्या आहेत.

  • स्विफ्ट चॅट या अ‍ॅपद्वारे विद्यार्थ्यांची उपस्थिती नोंदवली जाणार
  • पहिली ते दहावीच्या विद्यार्थ्यांच्या उपस्थितीबाबत निर्देश

एखाद्या शाळेतील एखाद्या वर्गाची तुकडी विनाअनुदानित असल्यास त्या वर्गातील विद्यार्थ्यांची उपस्थिती त्याच शाळेतील अनुदानित शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून नोंदवावी, चॅटबॉटद्वारे उपस्थिती नोंदविताना शालार्थ क्रमांकासाठी अडचणी आल्यास इतर शिक्षकांचा शालार्थ क्रमांक वापरून ऑनलाइन उपस्थिती नोंदवावी, विद्यार्थी उपस्थिती नोंदविताना अडचणी येत असल्यास शालार्थ संकेतस्थळ, सरल संकेतस्थळ, यू-डायस या सर्व संकेतस्थळांतील माहिती अद्ययावत करावी. सर्व संकेतस्थळांवरील अडचणी दूर झाल्यावर अडचणी दूर होतील, असे स्पष्ट केले आहे.

हेही वाचा

Back to top button