Pune News : डॉ. बाबा आढाव, डॉ. पी. डी. पाटील यांचा सन्मान | पुढारी

Pune News : डॉ. बाबा आढाव, डॉ. पी. डी. पाटील यांचा सन्मान

पुणे : ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव यांना प्रा. रामकृष्ण मोरे कृतज्ञता पुरस्कार, तर पिंपरी-चिंचवड येथील डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील यांचा जीवन गौरव पुरस्काराने छत्रपती डॉ. शाहू महाराज यांच्या हस्ते बालगंधर्व रंगमंदिरात बुधवारी सन्मानित करण्यात आले.

दिवंगत शिक्षणमंत्री प्रा. डॉ. रामकृष्ण मोरे यांच्या जयंती निमित्ताने डॉ. बाबा आढाव यांचा कृतज्ञता, तर डॉ. पी. डी. पाटील यांचा जीवन गौरव पुरस्काराने सन्मान करण्यात आला. छत्रपती डॉ. शाहू महाराज यांच्या हस्ते संत श्रीतुकाराम महाराज गाथा, त्यांची पगडी, उपरणे, तुळशी वृंदावन, सन्मानपत्र व पंचवीस हजार रुपयांचा धनादेश देऊन सत्कार करण्यात आला. या वेळी रामकृष्ण कृषी प्रतिष्ठानचे अध्यक्ष उल्हास पवार यांच्यासह प्रतिष्ठानचे सर्व पदाधिकारी, ज्येष्ठ कवी रामदास फुटाणे उपस्थित होते.

..अशी पिढी येऊ नये : छत्रपती शाहू महाराज

शाहू महाराज म्हणाले, आज फुले, शाहू, आंबेडकर यांच्या विचारांचा विसर पडत आहे. पुढच्या पिढीने ‘हू इज फुले, शाहू, आंबेडकर’ असे विचारण्याची वेळ येऊ नये. याची काळजी आपण त्यांना इंग्रजी शिक्षण देताना घेतली पाहिजे. नाहीतर पूर्वीसारखी समाज व्यवस्था निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. डॉ. पी. डी. पाटील यांनी राज्याच्या शिक्षणक्षेत्रात मोलाचे योगदान दिले आहे, या शब्दात पाटील यांच्या कार्याचा त्यांनी गौरव केला.

शिक्षक व कर्मचार्‍यांचा पुरस्कार : डॉ. पी. डी. पाटील

डॉ. डी. वाय. पाटील विद्यापीठाचे कुलपती डॉ. पी. डी. पाटील सत्काराला उत्तर देताना म्हणाले, आज माझ्यासाठी आनंदाचा दिवस आहे. शैक्षणिक क्षेत्रात काम करताना इतके नाव मिळेल याची कल्पना मी कधी केली नव्हती. याचे श्रेय मी माझ्या विद्यापीठातील शिक्षक व कर्मचार्‍यांना देतो. माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांनी खासगी शिक्षण संस्था सुरू करण्याची परवानगी दिली. त्या वेळी त्यांना खूप विरोध झाला. पण आज लाखो विद्यार्थी शिक्षण घेऊन देशाचे नाव मोठे करीत आहेत. डॉ. डी. वाय. पाटील व दिवंगत माजी शिक्षणमंत्री पतंगराव कदम यांनी अनेक धडाडीचे निर्णय घेतले. लाखो प्राध्यापकांना नोकर्‍या मिळाल्या.

हेही वाचा

Back to top button