

पारगाव : पुढारी वृत्तसेवा : नागापूर (ता. आंबेगाव) गावच्या हद्दीत बटाट्याचा पाला खाल्ल्याने विषबाधा होऊन ९ कालवडी व दोन गायींचा मृत्यू झाला. राजू करमन बरवाड या राजस्थानी गोपालकाचे सुमारे पाच लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. राजस्थानी गोपालक राजू करमन बरवाड हे नागापूर गावाच्या हद्दीत गेली २५ वर्षांपासून वास्तव्यास आहेत. थोरांदळे गावात अनेक शेतांमध्ये सध्या बटाटा काढणीची कामे वेगात सुरु आहेत. राजू बरवाड यांनी एका बटाटा शेतात कापून ठेवलेला पाला गायींसाठी आणला. त्यानंतर तो पाला गायी-कालवडींनी खाल्ल्यानंतर त्यातून त्यांना विषबाधा झाली. रात्री उशिरापर्यंत ९ कालवडी आणि २ गायी मृत्यूमुखी पडल्या. त्यांच्यावर वळती येथिल पशूधन वैद्यकीय अधिकारी ए. डी. परांडेकर, ए. एम. महाकाळ यांनी उपचार केले.
संबंधित बातम्या :
यंदा पाऊस कमी पडल्याने राजस्थानी गोपालकांपुढे चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. बटाटा काढणी सुरु झाल्यानंतर बटाट्याचा हिरवागार पाला गायींसाठी उपलब्ध होतो. यंदा गायींसाठी पाला उपलब्ध झाला. यामुळे राजस्थानी गोपालकांना मोठा दिलासा मिळाला होता. परंतु मंगळवारी (दि. ७) निरगुडसर-मेंगडेवाडी गावाच्या हद्दीत बटाट्याचा पाला खाल्ल्याने २० गायी मृत्यूमुखी पडल्याची घटना घडली होती. त्यानंतर नागापूर गावातही गायी मृत्युमुखी पडण्याची घटना घडल्याने राजस्थानी गोपालक हवालदील झाले आहेत .