Pune News : दिवाळी आली, आनंदाचा शिधा नाही! | पुढारी

Pune News : दिवाळी आली, आनंदाचा शिधा नाही!

पुणे : पुढारी वृत्तसेवा : दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपली असून, शहरातील लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा संच पोहचलाच नाही. ग्रामीण आणि शहरी भागांतील सुमारे 25 टक्के लाभार्थ्यांपर्यंत आनंदाचा शिधा पोहचला असून, शहरातील मंजूर किटपैकी 50 टक्केच शिधा पोहोचला. त्यामुळे पुण्यातील लाभार्थ्यांना अजूनही आनंदाचा शिधा किटची प्रतीक्षाच करावी लागणार असल्याचे चित्र आहे.
दिवाळीनिमित्त शिधापत्रिकाधारकांना शंभर रुपयांत आनंदाचा शिधा दिला जात आहे. मात्र, हा शिधा 30 नोव्हेंबरपर्यंत वाटप करावे, असे शासनाकडून सांगण्यात आले. परंतु, दिवाळीनंतर शिधा मिळाल्यास त्याचा काय उपयोग होणार, असा सवाल उपस्थित होत आहे.

ग्रामीण भागात पाच लाख 76 हजार 949 शिधापत्रिकाधारक आनंदाच्या शिध्यासाठी पात्र आहेत. मागणीनुसार शिधा प्राप्त झाला असून, दुकांनात पोहचला आहे. परंतु, मंगळवारी सायंकाळपर्यंत एक लाख 36 हजार 625 म्हणजेच 23.68 टक्केच लाभर्थ्यांनी शिधा घेतला आहे. पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रात तीन लाख 23 हजार 456 लाभार्थी असून, यातील सुमारे 25 टक्के लाभार्थ्यांनी शिधा घेतला आहे. तर आतापर्यंत मागणीनुसार 50 टक्केच शिधा दुकानांत पोहचला आहे. शिधा किटमधील मैदा अजून आलेला नाही, ते आल्यानंतर शंभर टक्के संच दुकानात पोहचतील. लाभार्थ्यांनी दुकानातून संच घेऊन जावे, असे आवाहन अन्नधान्य वितरण अधिकारी दादासाहेब गिते यांनी केले.

असा आहे आनंदाचा शिधा

पूर्वी आनंदाचा शिधा या संचात रवा, चणाडाळ, साखर आणि खाद्यतेल असे 4 जिन्नस होते. मात्र, राज्य शासनाने आता यामध्ये मैदा आणि पोहे, अशा दोन जिनसांचा नव्याने समावेश केला आहे. 1 किलो साखर, 1 लिटर खाद्यतेल तसेच प्रत्येकी अर्धा किलो रवा, चणाडाळ, मैदा आणि पोहे, असे आनंदाचा शिधाचे स्वरूप आहे.

जिल्हाधिकार्‍यांनी केली पाहणी

काळेपडळ-हडपसर येथील स्वस्त धान्य दुकानाला भेट देऊन शिधा वाटपाचा आढावा जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी घेतला. पुणे शहर व जिल्ह्यात सर्व स्वस्त धान्य दुकानांमध्ये आनंदाचा शिधा पोहचविण्यात येत असून, वाटपाची कार्यवाही सुरू आहे. नियमित धान्यासोबतच हा शिधाही शिधापत्रिकाधारकांनी न्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले आहे.

तालुकानिहाय लाभार्थी

आनंदाचा शिधाअंतर्गत पुणे ग्रामीणमध्ये आंबेगाव तालुक्यात 45 हजार शिधा संचांचे, बारामती 84 हजार 500, भोर 27 हजार, दौंड 27 हजार 300, केडगाव 26 हजार, हवेली 22 हजार 500, इंदापूर 68 हजार 300, जुन्नर 66 हजार 549, खेड 59 हजार 100, मावळ 37 हजार, मुळशी 18 हजार 500, शिरूर 20 हजार 900, तळेगाव ढमढेरे 28 हजार 500, वेल्हे 7 हजार 800 असे एकूण 5 लाख 76 हजार 949 शिधा संचांचे वाटप करण्यात येणार आहे.

हेही वाचा

Back to top button