Weather Update : नोव्हेंबरचा पहिला आठवडा 10 वर्षांत सर्वांत उष्ण | पुढारी

Weather Update : नोव्हेंबरचा पहिला आठवडा 10 वर्षांत सर्वांत उष्ण

पुणे : पुढारी वृत्तसेवा : नोव्हेंबरमध्ये शहरातील किमान तापमानाचा पारा 8.8 अंशांपेक्षाही खाली जातो. मात्र, यंदा हा पारा 18 ते 23 अंश सेल्सिअसवर गेल्याने रात्रीदेखील उकाडा जाणवत आहे. गेल्या दहा वर्षांत प्रथमच यंदा अशी स्थिती झाली आहे. पुणे शहर हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिध्द होते. मात्र, गेल्या काही वर्षांत हिवाळ्यात थंडीचे दिवस कमी होत आहेत. यंदा अल निनोचे वर्ष असल्याने हवामान विभागाने किमान तापमानात वाढ होण्याचे संकेत दिले होते.

त्याप्रमाणे नोव्हेंबरचा पहिला आठवडा संपत आला तरी शहरात थंडी सुरू झालेली नाही. गेल्या दहा वर्षांतील शहराच्या थंडीचा ताळेबंद तपासला असता असे लक्षात येते की, नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात किमान तापमानात मोठी वाढ झाली आहे. नोव्हेंबरमध्ये शहराचे सरासरी किमान तापमान 9 ते 11 अंशांवर राहते. मात्र, यंदा ते सतत 16 ते 21 अंशांवर गेले आहे.

शिवाजीनगरचे किमान तापमान गेल्या आठ दिवसांपासून 16 ते 18 अंशांवर तर कमाल तापमान 31 ते 32 अंशांवर आहे. यंदा किमान तापमानात तब्बल 5 ते 10 अंशांनी वाढ झाली आहे.

नोव्हेंबरमध्ये सर्वांत कमी थंडीचे दिवस

वर्ष  आणि  तापमान
12 नोव्हेंबर 2020 9.8 अंश सेल्सिअस
21 नोव्हेंबर 2021 10.9 अंश सेल्सिअस
10 नोव्हेंबर 2021 11.8 अंश सेल्सिअस
22 नोव्हेंबर 2022 8.8 अंश सेल्सिअस

यंदा अल निनोच्या परिणामामुळे हवामान विभागाने हा अंदाज आधीच जाहीर केला होता. त्याप्रमाणे अरबी समुद्रात तयार झालेल्या वादळांमुळे सतत ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे किमान तापमानात वाढ आहे. त्यामुळे थंडी कमी पडून रात्री देखील खूप उष्णता जाणवत आहे.

– अनुपम कश्यपी, हवामान विभागप्रमुख,
पुणे वेधशाळा

हेही वाचा

 

 

 

Back to top button