

पुणे : ससून रुग्णालयातून ड्रग रॅकेट चालविणार्या ललित पाटीलसह त्याचे साथीदार रोहन चौधरी व शिवाजी शिंदे यांच्या पोलिस कोठडीत 13 नोव्हेंबरपर्यंत वाढ करण्यात आली आहे. आरोपींचे अमली पदार्थ उत्पादन व विक्रीचे स्वरूप पाहता त्यांचे पुणे, मुंबई व नाशिकसह राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय कनेक्शन आहे का? याचा सखोल तपास करायचा असल्याचे पुणे पोलिसांनी न्यायालयात सांगितले.
ड्रग तस्करी रॅकेटप्रकरणी दाखल गुन्ह्यात आतापर्यंत पुणे पोलिसांनी 11 आरोपींना अटक केली आहे. त्यापैकी पाटील, चौधरी आणि शिंदे या तिघांची पोलिस कोठडी मंगळवारी संपली. त्यामुळे त्यांना शिवाजीनगर न्यायालयातील विशेष न्यायाधीश व्ही. ए. कचरे यांच्या न्यायालयात सादर करण्यात आले. या वेळी सरकारी वकील विजय फरगडे यांनी सरकार पक्षाची बाजू मांडत आरोपींना सात दिवस पोलिस कोठडी देण्याची मागणी केली. न्यायालयाने ती मान्य केली.
महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मोक्का) कलमवाढ करण्यात आली आहे. अरविंद लोहरे या टोळीचा प्रमुख आहे. पुणे पोलिसांना त्याच्यासह तीन आरोपी या गुन्ह्यात पाहिजे आहेत. सध्या ते तिघेही मुंबई पोलिसांच्या ताब्यात आहेत. त्यांचा ताबा घेऊन 14 आरोपींकडे एकत्रित तपास करण्यात येणार आहे. या प्रत्येकाचा गुन्ह्यातील 'रोल' शोधून काढायचा आहे, असे तपास अधिकारी सहायक पोलिस आयुक्त सुनील तांबे यांनी न्यायालयाला सांगितले.
रोहन चौधरी बिहारच्या एका खेड्यातील तरुण. त्याचे जेमतेम शिक्षण झाले आहे. त्यामुळे मेफेड्रॉन बनविणे आणि त्याचे प्रशिक्षण देणे, हे चौधरीला शक्य नाही, असा दावा त्याच्या वकिलांनी केला. मात्र, पोलिसांच्या तपासात त्याचा मेफेड्रॉन उत्पादनात महत्त्वाचा वाटा असल्याचे समोर आले आहे. चौधरीचा नाशिकच्या शिंदेगावातील फॅक्टरीत मेफेड्रॉन बनविण्याचे प्रशिक्षण, उत्पादन व विक्रीत सहभाग आहे. त्यास 'सायंटिस्ट' नावाने संबोधले जात होते. या टोळीचा म्होरक्या अरविंद लोहरे याचा असिस्टंट म्हणून चौधरी जबाबदारी पार पाडत होता, असे सुनील तांबे यांनी न्यायालयात सांगितले.
हेही वाचा